आत्मनिर्भर अभियानातून कोकणात भाजपकडून दिशाभूल : अॅड. अनिल परब - Ratnagiri Guardian Minister Anil Parab Criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

आत्मनिर्भर अभियानातून कोकणात भाजपकडून दिशाभूल : अॅड. अनिल परब

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जुलै 2020

'निसर्ग' चक्रीवादळाच्या नैर्सगिक आपत्तीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वेबच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली

रत्नागिरी : 'निसर्ग' चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी शासनाकडून मदत आली असतानाही भाजपचे नेते आत्मनिर्भर अभियानातून कोकणवासीयांची दिशाभूल करत आहेत. ही रॅली संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. आत्मनिर्भरचा अर्थ स्वावलंबी बनवणे आहे; मात्र भाजपा नेते सत्तारूढ पक्षाला बदनाम करत आहेत, असा आरोप पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी केला.

''अवघ्या पाच दिवसात रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोरोना तपासणी प्रयोगशाळा मंजूर केली. वादळानंतर एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केले. कोकणवासीयांना भरभरून नुकसान भरपाई दिली. यावर कोणीही बोलत नाही. चांगली कामे केलीत त्यावर कोणी बोलत नाही मात्र कारणाशिवाय विरोधक आरोप करत आहेत,'' असे अॅड. परब यांनी विरोधकांना ठणकावले.

रत्नागिरी जिल्ह्यात घरांच्या नुकसानीपोटी ८४ कोटी ४२ लाख वाटप केले. ८५ टक्‍के मदत वाटप झाली असून उर्वरित वितरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 'निसर्ग' चक्रीवादळाच्या नैर्सगिक आपत्तीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वेबच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, "रायगडामध्ये १०० कोटी, रत्नागिरीत ७५ कोटी तर सिंधुदुर्गात २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. १५३ कोटींचे म्हणजेच ८५ टक्के मदतीचे वाटप पूर्ण झाले असून राहिलेले १५ टक्के वाटपही लवकरच पूर्ण करू. रत्नागिरी जिल्ह्याला ११६ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात घरे, गोठ्यांसाठी ८४ कोटी ४२ लाख रुपये आले असून आतापर्यंत ५३ कोटींचे वाटप झाले आहे. ३१ कोटी ३३ लाख लवकरच वितरित केले जातील. जिल्ह्यासाठी अधिकच्या ५४ कोटीची मागणी केली आहे,''

ते पुढे म्हणाले, ''फळबागायतींसाठी १५ कोटी रुपये आले असून ४६ लाख रुपये वाटप झाले. हे वाटप साताबाऱ्यांवरील गोंधळामुळेच शिल्लक आहे. एका सातबाऱ्यावर अनेक नावे असल्यामुळे त्यांची संमतीपत्रे मिळणे अशक्‍य आहे. चक्रीवादळ बाधित कुटुंबातील काही लोकं मुंबईत राहतात. त्यांना तत्काळ मदत मिळावी व त्यासाठी वेळ लागू नये याकरीता हमीपत्र घेण्याची विनंती सरकारकडे केली होती. ती मान्य झाली असून त्यानुसार दोन दिवसात मदतीचे वितरण केले जाईल. दापोली तालुक्‍यात केलेल्या सर्व्हेक्षणात अर्धे अधिक घरांचे नुकसान झालेले असताना त्यांची नोंद अंशतः नुकसानीत झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन दापोली तहसीलदारांना फेरसर्व्हेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत,''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख