..तर रोजगार नसलेली पिढी हातात दगड घेईल : राजेंद्र कोंढरे - Rajendra Kondhare Demands Attention towards Maratha Yout | Politics Marathi News - Sarkarnama

..तर रोजगार नसलेली पिढी हातात दगड घेईल : राजेंद्र कोंढरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय घटकांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारावी; अन्यथा भविष्यात हाताला रोजगार नसलेली पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील, असा इशारा राजेंद्र कोंढरे यांनी दिला आहे

कोल्हापूर  : कपाळावर कुंकू असूनही एखाद्या विधवेसारखी मराठा समाजाची अवस्था झाली आहे. समाजातील काही गर्भश्रीमंतांकडे पाहून आरक्षण नाकारले जात आहे. केवळ राजकारणासाठी राज्यकर्तेही मूग गिळून गप्प आहेत. त्यांची ही भूमिका चुकीची असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी येथे केली.

मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय घटकांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारावी; अन्यथा भविष्यात हाताला रोजगार नसलेली पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

श्री. कोंढरे म्हणाले, "राज्य शासनाने राज्यसेवा पूर्व परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव व मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या परीक्षेसाठी सुमारे दोन लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. पैकी एसईबीसीमधून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा ४२ हजार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. बारावीला १२ लाख तर नववीला १४ लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आकडेवारी सांगते. 

ते पुढे म्हणाले, ''त्यातही राज्य शासनाची वेळोवेळी भरती होत नाही. अनुशेषात घोटाळे आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचे मार्गदर्शक व अधिकारीवर्ग विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखवत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची क्षमता आहे, त्यांनी ती जरूर द्यावी. इतर विद्यार्थ्यांनी अन्य क्षेत्रांचा पर्याय शोधावा.''

"मराठवाडा व विदर्भात मराठा समाजाचे ४६ टक्के प्रमाण आहे. मराठवाड्यात रस्ते, रेल्वे, वीज, पाणी आदी समस्या आहेत. उस्मानाबाद व बीड येथील मुले पुण्यात टॅक्‍सीचालक म्हणून काम करत आहेत. त्यात ७० टक्के चालक मराठा समाजाचे आहेत. ऊस तोडणी कामगारांत मराठा समाजाचे प्रमाण २९ टक्के आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. राज्यात कौशल्य विभाग, सारथी, महाज्योती, अमृत, बार्टी, टीआरटी अशा प्रत्येक प्रवर्गाच्या संस्थांची कार्यक्षमता वाढवून तेथून युवकांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.'' असेही ते म्हणाले.

सारथीचे उपकेंद्र कोल्हापूरला झाले पाहिजे, असे स्पष्ट करत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती घराण्याबाबत आदर ठेवावयला हवा, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी कुणबी दाखला देण्यात भ्रष्टाचार होत असून, आंदोलनाचा भडका उडाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असेल, असा इशारा यावेळी दिला.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


स्पर्धा परीक्षेसाठी वर्षनिहाय भरलेली पदे व विद्यार्थी संख्या..

वर्ष पदे  विद्यार्थी
२०१९-२० ४८६७ १५,३४,३३७
२०१८-१९ ५३६३ २६,६४,०४१
२०१७-१८ ८६८८ १७,४१,०६९
२०१६-१७ ३२५४ ११,२४,२००
२०१५-१६ ५४९२ ५,२९,६९५