तुम्ही पंकजा मुंडेंना `ओव्हरटेक` करताय? : यावर आमदार सुरेश धस म्हणाले... - I am not trying to overtake Pankaja Munde says suresh dhas | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही पंकजा मुंडेंना `ओव्हरटेक` करताय? : यावर आमदार सुरेश धस म्हणाले...

महेश जगताप
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

सुरेश धस यांची `सरकारनामा`ला खास मुलाखत. ही मुलाखत सरकारनामाच्या सर्व सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर पाहता येणार आहे. 

पुणे : ऊसतोडणी मजुरांच्या वेतन दरवाढ बैठकीत मला प्रवेश मिळू नये यासाठी बीडमधील नेत्यांनीच प्रयत्न केले. त्यांचा हिशोब मी योग्य वेळी चुकता करीन, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिला. हा नेता सत्ताधारी पक्षातील की विरोधी पक्षातील, असा प्रश्न विचारल्यावर धस यांनी त्या विषयावर मला आता बोलायचे नाही, योग्य वेळी बोलेन असे स्पष्ट केले. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नात पंकजा मुंडे यांना ओव्हरटेक करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का, या प्रश्नावर असे काही नाही. भाजपच्या नेत्यांशी बोलल्यानंतरच मी या प्रश्नी राज्यभर दौर केल्याचा खुलासा त्यांनी केला.

या मजुरांच्या वेतनदरवाढीसाठी पुण्यातील मांजरी जवळील वसंतदादा शुगर इन्स्टिट्टयूटमध्ये राज्य सहकारी साखर संघ, मजूर संघटना यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी धस यांची संघटना ही मान्यताप्राप्त नसल्याचा मुद्दा करत त्यांना बैठकीस येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर धस यांनी आंदोलन करून बैठकीत प्रवेश मिळवला.

यानंतर `सरकारनामा`ला दिलेल्या खास मुलाखतीत धस म्हणाले की ऊसतोडणी मजूरांच्या संघटनांचा प्रभाव कमी झाल्याने आम्हाला 14 टक्के इतकी अत्यल्प वाढ मिळाली आहे. ही वाढ आम्हाला मान्य नाही. फेब्रुवारीमध्ये मी माझ्या संघटनेचा ताकद दाखवून देईन.

तुम्ही ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांत एवढे आक्रमक का झालात? पंकजा मुंडे यांचे नेतृत्त्व असताना तुम्ही लक्ष घालून त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहात का, या प्रश्नांवर धस म्हणाले की मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या प्रश्नांत लक्ष घातले आहे. आदरणीय ताईसाहेब (पंकजा मुंडे) यांनाही याची कल्पना दिली आहे. हे मजूर आता केवळ बीड जिल्ह्यापुरते आणि विशिष्ट समाजापुरते राहिलेले नाहीत. धुळे, नंदुरबार, यवतमाळ, जालना अशा जिल्ह्यांतील मजुरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजप म्हणून या प्रश्नी लक्ष घालत आहे. यात कोणाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न नाही.

पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर तुम्ही त्यांचे अभिनंदन केले का, असे विचारल्यावर ते म्हणाले की मी त्यांना अभिनंदनाचा मेसेज पाठवला होता. पण त्यांचे उत्तर आले नाही. 

दसरा मेळाव्यात बोलताना महादेव जानकर आणि माझ्या जोडीला दृष्ट लागू नये, असे विधान पंकजा यांनी केले होते. याचा दुसरा अर्थ असा काढण्यात आला की तुमच्या आणि त्यांच्या जोडीला दृष्ट लागली आहे, यावर धस म्हणाले की असे काही नाही. त्या माझ्या नेत्या आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या मेळाव्यात त्यांच्या नावाचा मी उल्लेख करत असतो. आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला हार घालूनच माझ्या मेळाव्याला सुरवात होत असते. त्यामुळे आमच्यात वितृष्ट नाही.

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख