बिहारमध्ये प्रचार करण्याऐवजी पूरस्थितीसाठी एकत्र या : मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आवाहन - CM Thackeray Appeals Devendra Fadanavis to Help in Flood Situation | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये प्रचार करण्याऐवजी पूरस्थितीसाठी एकत्र या : मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आवाहन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या संकट संपलेले नाही. प्राणहानी  होऊ देऊ नका अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले

सोलापूर : ''राज्याल्या पूरस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी आवश्यकता असेल तर आम्ही केंद्राची मदत मागणार आहोत.  विरोधी पक्षनेत्यांनी त्यासाठी दिल्लीत जावे. विरोधी पक्षनेत्यांनी बिहार मध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यातील प्रश्नासाठी एकत्र येऊन केंद्राकडे मदतीची मागणी करावी,'' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. 

राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना  बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही केवळ काहीतरी घोषणा करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे. अजून परतीचा पाउस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही. धोक्याचा इशारा आहे मात्र  पंचनामे सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल,"

"जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या संकट संपलेले नाही. प्राणहानी  होऊ देऊ नका अशा सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. राजकारणाचा चिखल उडवू नये,'' असेही आवाहन ठाकरे यांनी केले. 

''पावसाची ही परिस्थिती आत्ताच,आजच कळली असे नाही. आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते.  उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे. यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले, पूर्व विदर्भात पूर आला , त्यावेळीही आम्ही  मदत केली आहे .शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही.पाउस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही. उजनी धरणातील विसर्गाबाबत  पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला  जाईल,'' असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर देत गेले तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. केंद्र व राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करु नये. कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते. राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे. आपत्तीग्रस्तांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे ठाकरे यांनी आज सकाळी अक्कलकोट येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख