मराठ्यांचे कैवारी, स्ट्राँग मॅन, तुमच्यावरील विश्वास उडाला तर लोक खाली खेचतील : उदयनराजे - Udayanraje Bhosale Taunts Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मराठ्यांचे कैवारी, स्ट्राँग मॅन, तुमच्यावरील विश्वास उडाला तर लोक खाली खेचतील : उदयनराजे

उमेश बांबरे
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

लोकप्रतिनिधींची मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी आहे. अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही हीच मंडळी असतील,असा इशारा उदयनराजेंनी दिला

सातारा : ''आपल्याकडे काही मोठी लोक आहेत, ती वयाने मोठी आहेत. ते स्वतःला मोठे समाजात कारण तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिले. ते आम्ही मराठ्याचे कैवारी आहोत, असे सांगतात.  मराठा 'स्ट्राँग मॅन' ही उपमा कधी लागू केली. ज्या लोकांनी तुम्हाला मानपान दिला, सन्मान केला. योग्यतेचे समजून  विश्वास ठेवला. त्यांचा तुमच्यावरील विश्वास उडाला तर हीच लोक तुम्हाला खाली खेचू शकतात,'' असा टोला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा  नामोल्लेख टाळून लगावला. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मराठा आरक्षण प्रश्नावर आपली भुमिका मांडताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर  टीकेची झोड उठविली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. लोकशाहीत कोण मोठे कोण छोटे नाही. वयाचा आदर नेहमीच असेल. पण तरूणांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल, असेही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे म्हणाले, ''मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले, पण कोठेही हिंसा झाली नाही. आणखी किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. तुम्ही केले नाही तर त्याचे उत्तर दिले पाहिजे. याचा प्रश्न पुढची पिढी तुम्हाला विचारेल. मग शर्मेने लाथ घालावी लागेल. अजूनही तेच सत्तेत आहेत. त्यांना सखोल माहिती  आहे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का राहिला, सत्तेत असलेल्यांनी का सोडविला नाही, मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही, या मराठा समाजाच्या व्यथा आहेत,''

ते पुढे म्हणाले,''तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी 1989 मध्ये मंडल आयोग लागू केला. त्यावेळी प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आले, पण मराठा समाजाला सोयीप्रमाणे मागे ठेवले गेले. त्यावेळी हा राज्यस्तरावरील प्रश्न होता. राज्याने पुढाकार घ्यायला हवा होता. त्यावेळचे मुख्यमंत्री व इतर मंत्री यांनी यावर भाष्य करणे गरजेचे आहे, अशी सर्व मराठा समाजातील तरूणांची मागणी आहे. इतरांचे अधिकार कमी करा, असे मराठा समाज कधीच म्हणाला नाही. प्रत्येकाला न्याय मग आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, ''ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते, त्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे,''

''मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला की त्याला काऊंटर करण्यासाठी इतर वेगवेगळे मोर्चे काढण्यात हीच मंडळी आघाडीवर होती. ते कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाने काय पाप केले. द्यायचे नव्हते तर कोणालाच द्यायला नको होते. मग मराठा समाजावर अन्याय का. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सर्वधर्म समभाव शिकवण दिली. तर या लोकांनी जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहिले पाहिजेत, असे महाराजांना वाटत होते. पण आता समाजात फुट वाढत चालली आहे,''

प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी

''मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणीच बोलण्यास तयार नाही. प्रत्येकाला आपल्यावर गदा येईल म्हणून कोणीही बोलत नाहीत. आज परिस्थिती बदलली आहे. माझी या सर्वांना कळकळीची विनंती आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेत जेवढे मराठा समाजाचे आमदार, खासदार आहेत. तसेच मराठा समाजाव्यतिरिक्त जे आमदार, खासदार आहेत. या प्रत्येकाची लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणे नैतिक जबाबदारी आहे," अशी जाणीव उदयनराजेंनी दिली

अन्यथा अनर्थ होईल

''प्रत्येकाच्या मतदारसंघात मराठा समाजाचे लोक आहेत. त्यांच्या मतांमुळे ते लोकप्रतिनिधी झाले आहेत. आता या लोकप्रतिनिधींची मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी आहे. अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही हीच मंडळी असतील,'' असा इशारा उदयनराजेंनी दिला.

परिक्षेच्या संदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले, ''कोरोनाचे सावट आहे. पण ज्यावेळी परिक्षा घ्याल त्यावेळी मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून परिक्षा घ्या. असे झाले नाही. तर आम्ही न्याय व्यवस्थेकडे ज्याआशेने बघतो, ते कधीतरी न्याय देतील,''

मराठा आरक्षणाच्या सुनावणीवेळी जिल्हा न्यायालयात ही तारिख मिळते का नाही, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ''सर्व न्यायालयात हीच परिस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने तारिख दिली. त्या तारखेला राज्य शासनाचा वकिल हजर राहात नाही. वकिलाला फी देता, ती फी लोकांच्या पैशातून दिली जाते. करातून वसुली केलेल्या पैशातून शासन चालते. सर्वोच्च न्यायालयात तुमचे वकिला हजर राहात नाही. यामध्ये सर्वजण दोषी आहेत. बोट दाखवायचे बंद करा. मराठा आरक्षणावर काही तरी करायचे आहे तर हो म्हणा. कोरोनामुळे लोक शांत आहेत, अन्यथा लोक तुम्हाला घरातून बाहेर पडू देणार नाहीत. मराठा समाजावर अन्याय होत असताना त्यांना दाबत गेला, तर ॲक्शनला रियॅक्शन होणारच. त्यावेळी नुकसान होणार, त्यालाहीच हेच लोक जबाबदार असतील. प्रत्येक वेळी दुसऱ्याला नावे ठेवायची. प्रत्येक वेळी जातीचे राजकारण करायचे असेल तर राजीनामा देऊन घरी बसा, किती वेळा हा इश्यु करायचा,''

फडणवीसांची पाठराखण....
देवेंद्र फडणवीस माझ्या वायाचेच आहेत. त्यांनी निर्णय घेतला आरक्षण टिकविले, पुढाकार घेतला. आता त्यांनाच नावे ठेवत आहेत. तुम्ही सत्तेत आला मग का पुढे नेले नाही. उलट वकिलाला दाबून टाकले. वकिल न्यायालयात पोहोचू नये म्हणून ट्रेन उशीरा, प्लेन उशीरा आले. एवढे मराठा समाजाला तुम्ही किरकोळीत काढता, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, ''मराठा समाजाला पुढे जायचे असेल एक लक्षात घ्या. इतर जातीसोबत मराठा समाज ही निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत त्याकडून आश्वासन घ्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस लावणार असाल तरचआम्ही तुमच्यासोबत आहोत, असे ठासून सांगा,''

Edited By - Amit Golwalkar  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख