...आणि प्रकाश आंबेडकरांनी 'या' प्रश्नाचे उत्तर टाळले! - Prakash Ambedkar Opposes Further Lock Down in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

...आणि प्रकाश आंबेडकरांनी 'या' प्रश्नाचे उत्तर टाळले!

मनोज भिवगडे
सोमवार, 27 जुलै 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायतीच्या सदस्यांची कोरोना चाचणी राज्य सरकारने करून घेतली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.

अकोला :  अलीकडच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यात शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग होण्याची शक्‍यता आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे कुटुंबासोबत मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे माझे चांगले मित्र होते, पण त्यात राजकीय मैत्री नव्हती. उद्धवजीही माझे मित्र आहेत. त्यांच्या भेटी मागे कोणताही राजकीय उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले. 

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी वाढविल्याने येणाऱ्या अडचणींबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायतीच्या सदस्यांची कोरोना चाचणी राज्य सरकारने करून घेतली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते  अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.

महत्त्वाच्या पदावरच्यांची कोविड चाचणी हवी

या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात सामान्य नागरिक येतात. त्यामुळे त्यांची चाचणी तातडीने होणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच त्यांनी राज्यातील सर्व महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींनी कोविड चाचणी करून घ्यायला हवी, असा सल्लाही दिला. त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली असल्याचे यावेळी सांगितले.

लाॅकडाऊन वाढवल्या आंदोलन

कोरोना विषाणू मुळे राज्यासह देशात २४  मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याला मुदतवाढ देत ३१ जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला. त्यामुळे सामान्य जनता, व्यापाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पुन्हा लॉकडाउन वाढवल्यास जनतेसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. लॉकडाउनच्या काळात कामधंदे बंद आहेत. व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाउन वाढविल्यास हातावर पोट असणारे व छोटे व्यावसायिक यांच्यावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन वाढविण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. 

लॉकडाउनचा कालावधी आता पुन्हा वाढवल्यास जनतेचा संयम सुटेल. अशा वेळी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीही राज्यभर आंदोलनात उतरेल, असा इशारा आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख