भाजपचे व्यापारी  कृषी विधेयकाच्या साह्याने शेतकऱ्यांना लुटतील  : नसीम खान यांचा आरोप - Farmers will be looted through Farm Bill Alleges Congress Leader Naseem Khan | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे व्यापारी  कृषी विधेयकाच्या साह्याने शेतकऱ्यांना लुटतील  : नसीम खान यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांचे हित साधण्याच्या फक्त गप्पाच केल्या, मात्र त्यांची आश्वासनपूर्ती एकदाही केली नाही, असा आरोप नसीम खान यांनी  समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडियोमध्ये व्यक्त केला आहे. 

मुंबई : नव्या कृषी विधेयकाचा फायदा घेऊन काळाबाजार करणारे भाजपचे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करू नयेत म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची जुनी पद्धत कायम ठेवावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे म्हणणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री मो. आरीफ (नसीम) खान यांनी मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षात शेतकऱ्यांचे हित साधण्याच्या फक्त गप्पाच केल्या, मात्र त्यांची आश्वासनपूर्ती एकदाही केली नाही, असाही आरोप त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडियोमध्ये व्यक्त केला आहे. 

गेली सहा वर्षे देशातील प्रत्येक निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याच्या बाता मारल्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे स्वप्न दाखवले, आधारभूत किंमत वाढविण्याचे आश्वासन दिले, अन्य वेगवेगळ्या बाबी करण्याची लालूच दाखवली. मात्र या काळात त्यांनी शेतकऱ्यांची एकही मागणी पूर्ण केली नाही किंवा दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.  त्यामुळे गेल्या सहा वर्षात देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा दावाही नसीम खान यांनी केला. 

संसदेतील बहुमताच्या जोरावर भाजपने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे कृषी विधेयक मंजूर करवून घेतले. या काळ्या विधेयकाचा काँग्रेस निषेध करीत असून त्याविरोधात पक्ष कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी रस्त्यावर उतरतील. देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना हे विधेयक नको असल्याने त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. हे विधेयक मागे घेण्याची मागणी करणाऱ्या या शेतकऱ्यांवर भाजप सरकार दडपशाही करीत असून त्याचाही काँग्रेस पक्ष प्राणपणाने विरोध करेल. काळाबाजार करणारे भाजपचे व्यापारी या विधेयकाच्या साह्याने शेतकऱ्यांची फसवणूक करतील. हे टाळण्यासाठी  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे हक्क किंवा किमान आधारभूत  किमतीची पद्धत सुरुच ठेवावी. तसेच शेतकऱ्यांचा सर्वनाश करणारे हे विधेयक तत्काळ मागे घ्यावी, अशीही मागणी खान यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख