मुख्यमंत्री म्हणाले, तुकाराम मुंढेंच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला पाहिजे ! - the chief minister said everyone should stand behind tukaram mundhe | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणाले, तुकाराम मुंढेंच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला पाहिजे !

अतुल मेहेरे 
रविवार, 26 जुलै 2020

महाविकास आघाडीचे सरकार मुंढेंसोबत आहे. त्यामुळे मुंढेंना नमविण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना यापेक्षाही जास्त कष्ट उपसावे लागतील, असं दिसतंय. पण राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आणि मुंढेंचा निश्‍चयी स्वभाव, यांमुळे सत्ताधाऱ्यांना ते जमेल की नाही, हे येणारा काळच सांगणार आहे.

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमधील संवादाची सुरुवातच वादविवादाने झाली. नंतर नंतर हा वाद येवढा टोकाला गेला की, एकमेकांना अडकविण्यासाठी सुरू झाली षडयंत्रांची श्रृंखला. हा वाद राज्यभर गाजला आणि सध्याही गाजतोय. फक्त कोरोनाच्या स्थितीमुळे मुंढे विरोधाची धार अधेमध्ये कमी-अधिक होत राहते. हा वाद नितीन गडकरींच्या माध्यमातून केंद्र सरकार पर्यंतदेखील पोचला. मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला नसेल, तर नवलच. तो पोचला, अन ‘अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी सर्वांनी उभं राहायला पाहिजे.‘, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंढेंची पाठराखण केली. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना‘साठी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये एक प्रश्‍न नागपूर महानगरपालिमध्ये सुरु असलेल्या वादाबाबतही होता. राऊत यांनी विचारले की, ‘नागपुरात तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय.‘ यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘बरोबर आहे, तुम्ही ही सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या. मंत्रालय की सचिवालय हा वाद हवा कशाला? सचिव पद्धतच बंद करुन टाका. पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड. आॅर्डर पण तुम्हीच काढायची, कामं पण तुम्हीच करायची. मदतीचं वाटप वगैरे तुम्हीच करायचं. 

‘राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की त्या लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन', या प्रश्‍नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रश्‍न केला की, ‘तुमचं मत काय? कोणाचं बरोबर आहे?‘ यावर राऊत म्हणाले, ‘अर्थात शिस्तीच्या मागे उभे राहायला हवे.‘ यावर ठाकरे म्हणाले, ‘मग तसंच आहे. एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो. असेल... पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्यावेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले, हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल, तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असते. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत, हे विसरुन चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही.‘ 

`सामना‘च्या या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहे, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही नागपुरातील नद्यांचे व्यवस्थापण उत्कृष्ठपणे केल्याबद्दल मुंढेंचे ट्विटरवर कौतुक केले आहे. मुंढे आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील आतापर्यंतचा संघर्ष बघितला तर हे लक्षात येते की, मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्रीसुद्धा तुकाराम मुंढे यांच्या सोबत आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार मुंढेंसोबत आहे. त्यामुळे मुंढेंना नमविण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना यापेक्षाही जास्त कष्ट उपसावे लागतील, असं दिसतंय. पण राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा आणि मुंढेंचा निश्‍चयी स्वभाव, यांमुळे सत्ताधाऱ्यांना ते जमेल की नाही, हे येणारा काळच सांगणार आहे. पण हा संघर्ष ईतक्यात थांबणारा नाही, हेही तेवढेच खरे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख