मराठा आरक्षणाबाबत ५ फेब्रुवारीपर्यंत वाट पहा : छत्रपती संभाजीराजेंचा सल्ला - Wait till Fifth February Appeal by Sambhajiraje to Maratha Community | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत ५ फेब्रुवारीपर्यंत वाट पहा : छत्रपती संभाजीराजेंचा सल्ला

सागर आव्हाड
रविवार, 31 जानेवारी 2021

राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मराठा आरक्षण हा न्यायप्रविष्ठ विषय आहे, आंदोलन करण्यापेक्षा सरकारने न्यायालयात कशी बाजू मांडावी, यासाठी प्रयत्न करायला हवे, आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या जीवावर कोणताही विपरीत परिणाम होण्यापेक्षा आंदोलने मागे घ्यावीत, अशी विनंती त्यांनी केली. 

पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मराठा आरक्षण हा न्यायप्रविष्ठ विषय आहे, आंदोलन करण्यापेक्षा सरकारने न्यायालयात कशी बाजू मांडावी, यासाठी प्रयत्न करायला हवे, आंदोलनातून कार्यकर्त्यांच्या जीवावर कोणताही विपरीत परिणाम होण्यापेक्षा आंदोलने मागे घ्यावीत, अशी विनंती त्यांनी केली. 

याबाबत बोलताना ते म्हणाले, "राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. येत्या ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरती सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. आपण सर्वांनी ५  फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणं आवश्यक आहे. औरंगाबादला मी जाणार होतो. मात्र काही कारणामुळे जाता आलं नाही. आंदोलन मागे घेतलं नसेल तर मागे घ्यावं अशी मी विनंती करतोय,''

साताऱ्यातील एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते, त्यावर तिन्ही राजे एकत्र येणार का हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत. सगळ्यांची भूमिका एक आहे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सातारा आणि कोल्हापूर या गाद्या वेगळ्या नाहीत. आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळे  एकत्र येण्याचा प्रश्नच नाही,'' कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांच नाव द्याव ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

औरंगाबाद विमानतळाचा नामांतराच्या विषयावर बोलताना हा नेमका राजकारणाचा विषय आहे का काय कळत नाही. मात्र औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करायला काय हरकतं आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी नामांतराला पाठिंबा दर्शवला. दिल्लीत जे शेतकरी आंदोलन चाललंय त्यामध्ये सहभागी असलेला शेतकरी हा शेतकरीच असतो. त्याची इतर कोणत्या गोष्टींशी तुलना करणं चूकीचं आहे. शेतकऱ्याला त्रास होणार याची खबरदारी ही सत्ताधारी सरकारने घ्यायला हवी, असे ते म्हणाले. राज्यात वीज बिलांचा जो प्रश्न आहे त्याबाबत सरकारने योग्य ती भूमीका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख