शरद पवार म्हणतात....सहा महिन्यांत आमचा विद्यार्थी पूर्णपणे 'पास' झाला - NCP President Sharad Pawar Praises CM Uddhav Thackeray's Performance | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार म्हणतात....सहा महिन्यांत आमचा विद्यार्थी पूर्णपणे 'पास' झाला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 जुलै 2020

सरकारला सहा महिने पूर्ण होत असताना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक व खासदार संजय राऊत यांनी पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज 'सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात पवार यांनी सरकारच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्वात महत्त्वाची भूमीका होती. आता सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले असताना आमचा 'विद्यार्थी' परिक्षेत पूर्णपणे पास झाला, असे प्रशस्तीपत्रक पवारांनी दिले आहे. हे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयीच बोलतो आहे, हे देखिल त्यांनी स्पष्ट केले. 

सरकारला सहा महिने पूर्ण होत असताना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक व खासदार संजय राऊत यांनी पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज 'सामना'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यात पवार यांनी सरकारच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सहा महिने हा परीक्षेचा काळ असतो. जसे पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा असायच्या. मग ते प्रगती पुस्तक यायच्या पालकांकडे. या सरकारचे तसे सहा महिन्यांचे प्रगती पुस्तक आपल्याकडे आले आहे का असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता.. 

त्यावर बोलताना पवार म्हणाले, "बरोबर आहे. पण आता ही सहामाही परीक्षा झाली आहे.  पूर्ण झाली असे मला वाटत नाही. परीक्षेतला प्रात्यक्षिकांचा भाग अजूनही बाकी आहे. आणि तोच सर्वात तर महत्त्वाचा आहे. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या कामगिरीवरुन तरी प्रात्यक्षिकांमध्ये सुद्धा हे सरकार यशस्वी होईल, असे दिसते आहे,"

"दुसरे महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी माझी खात्री आहे,'' असेही पवार या मुलाखतीत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आपण हे सांगता आहात काय, असे विचारले असता, "अर्थात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयीच मी हे बोलतोय. कारण शेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम काम करते. त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचाही आढावा मुलाखतीत घेतला. राज्य सरकारचं उत्पन्नच घटलं हे खरे आहे, असे सांगून ते म्हणाले, "मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अर्थसंकल्पात राज्याच्या उत्पन्नाचा आकडा तीन लाक ९० हजार कोटींच्या आसपास होता. त्यानंतर तीन महिने गेले. सरकारची आवक थांबली. या काळात किती उत्पन्न येईल याचा अंदाज बांधला तर त्याच्यात ५० टक्क्यांच्यापेक्षा जास्त फटका या तीन महिन्यांतच बसला असे दिसते आहे. याचा अर्थ सरकारचीसुद्धा आर्थिक ताकद घटायला लागलेली आहे,''

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांबाबत बोलताना पवार म्हणाले, "यालाच आपण आर्थिक संकट म्हणू शकतो. त्यामुळे सरकारलासुद्धा आता मर्यादा आहेत. पगार करणे अवघड असल्याचे मी अर्थमंत्र्यांकडूनही ऐकले आहे. पण तरीसुद्धा सरकारचा सतत प्रयत्न आहे की, काहीही करून कर्मचाऱयांचे वेतन द्यायचेच आणि आजच्या महिन्यापर्यंत सर्व कर्मचाऱयांना वेतन दिलं आहे, पण कदाचित पुढे कर्ज काढावं लागेल अशी परिस्थिती दिसते, पण त्यावरही मार्ग काढता येऊ शकेल,"

''या सगळय़ा परिस्थितीत नागरिकांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेतली. सरकारकडून त्यांच्या अपेक्षा नक्कीच आहेत, पण त्यांना हेही ठाऊक आहे की, सरकारचीच आवक थांबलेली आहे. सरकारचीच आवक थांबल्याचे सामान्य जनांच्या नजरेला येते तेव्हा लोकसुद्धा आपण किती आग्रह करायचा, किती हट्ट करायचा, किती संघर्ष करायचा या सगळय़ा गोष्टींत अत्यंत सामंजस्य लोकांनी दाखवले आहे,'' असे सांगत पवार यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचे कौतुक केले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख