शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली  - Gopichand Padalkar Statement against Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 जून 2020

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचा गंभीर आरोप आमदार पडळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज पंढरपुरात बोलताना पडळकर यांची जीभ घसरली.

पंढरपूर : शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचा गंभीर आरोप आमदार पडळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे. धनगर आरक्षणाबाबत आज पंढरपुरात बोलताना पडळकर यांची जीभ घसरली. ''पवार यांनी राज्याचे नेतृत्त्व केले. पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही.  फक्त आरक्षणाचे राजकारण पवार करत आहेत," असेही पडळकर म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन जाहीर केले आहे.

कोरोनामुळे आषाढी वारीची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत झाली. महाराज मंडळी आणि बाहेरील लोकांना जर पंढरपूरात प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोध केला जाईल, असे  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ही त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली आहेदरम्यान, राज्याचे गृहमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. पवार यांचा अशा पद्धतीने विरोध करणे चूक आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपूरात उद्यापासून प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपूरात आलेल्या महाराजांना पंढरपूर मध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही.  कारण कोरोना चा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबई मधून ते येणार आहेत, असे सांगत पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन केले आहे. 

मागे मराठा आंदोलनाच्या वेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर श्री विठ्ठलाची पुजा केली होती. तशी पुजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे. यातून वारकऱ्यांनाही दिसेल की राज्यात कायदा पाळला जातोय. यावेळी एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान द्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, " मागील सरकारने एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, विश्वासघातामुळे सरकार स्थापन होऊ न शकल्याने त्यांना यावर कार्यवाही करता आली नाही. या सरकारने एक रुपयाही दिलेला नाही. त्यात पाच वसतीगृहे आहेत. विद्यार्थ्यांना मदतीची तरतूद आहे. पण हे सरकार त्यावर काही करु शकलेले नाही. येत्या अधिवेशनात आम्हाला हे मुद्दे मांडावे लागतील. राज्य सरकार वेगवेगळ्या समाजांबाबत वेगवेगळी भूमीका घेत आहे. आमचेही प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर तुम्ही का वकिल देत नाही, असे आम्हाला सरकारला विचारायचे आहे,"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख