केंद्राचे दुकान चालण्यासाठी राज्याची दुकाने चालवली पाहिजेत - शरद पवार

केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे. केंद्राकडे जागतिक बँक किंवा एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र जे काही करु शकते, ते राज्यांना शक्य नाही, असे सांगत शरद पवार यांनी केंद्राने राज्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली
Sharad Pawar Says Central Government Should Help States in Corona Crisis
Sharad Pawar Says Central Government Should Help States in Corona Crisis

पुणे : केंद्राच्या सर्व उत्पन्नाचे मार्ग राज्यांतूनच आहेत. त्यामुळे या आपत्तीत राज्यांची अर्थव्यवस्था, राज्यांचे व्यवहार, उत्पादन गतीमान झाले तर त्यातून राज्यांचे उत्पन्न वाढेल व त्याचाच भाग केंद्राला मिळेल. म्हणून केंद्राला आपले दुकान चालवण्यासाठी राज्यांची दुकाने चालवली पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत दिली.

या प्रदीर्घ मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीतल पवार यांनी राज्यात व देशात कोरोनाने उद्भवलेल्या आर्थिक संकटाबाबत आपली मते व्यक्त केली. पवार म्हणाले, " केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे. केंद्राकडे जागतिक बँक किंवा एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र जे काही करु शकते, ते राज्यांना शक्य नाही. राज्यांना कर्जरूपाने पैसा उभा करायचा असेल तर त्यांना याबाबत स्वतः निर्णय घेता येत नाही. प्रत्येक राज्याने किती कर्ज काढायचं याची सीमा केंद्र सरकारने ठरवून दिलेली असते आणि त्यामुळे राज्यांना मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज काढून आपण राज्ये स्थिरस्थावर केली तर आपण एक चौकट तयार करू आणि घेतलेले कर्जही परत करू शकू,''

हे देखिल वाचा -

मोदीचे सहकार अननुभवी

महाराष्ट्र व देशासमोर आलेले संकट दूर करण्यात कुठे समन्वयाची तुम्हाला कमतरता दिसतेय का, या प्रश्नावर पवार म्हणाले, "पंतप्रधानांनी इतर पक्षांच्या काही जाणकार लोकांशी बोलण्याची गरज आहे, असे मला वाटते. संकटाची व्याप्ती पाहता हे सर्व आपणच सोडवून टाकू, ही भूमिका कुठल्या तरी एकाच पक्षाने घेऊन चालणार नाही. या वेळेला ज्यांची ज्यांची मदत होणं शक्य आहे त्या सगळय़ांना बरोबर घेण्यासंबंधी प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी साहेबांच्या सेटअपमध्ये असे अनेक सहकारी असे आहेत की, या अशा प्रकारच्या कामाचा अनुभव त्यांना नाही. कोरोनाचं म्हणाल तर, तसा अनुभव कुणालाही नाही. आम्हालाही नाही. कारण असे संकट आपण पाहिले नव्हते, पण त्यावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावले टाकायला सगळय़ांची साथ घेतली पाहिजे, त्याची आम्हाला कमतरता दिसते''

केंद्रीय अर्थमंत्र्यांशी कधी भेटही झाली नाही
''इतका मोठा देश, मोठी लोकसंख्या म्हटल्यावर रोज समोर असे प्रश्न उभे राहतात, देशाची अर्थव्यवस्थाच जेव्हा संकटात सापडते त्या वेळेला एक प्रकारचा डायलॉग इतरांसोबत पाहिजे, तो डायलॉग मला सध्या दिसत नाही,'' असे सांगत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी आपली कधी साधी भेटही झालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com