एकनाथ खडसेंबद्दल अजित पवारांचे मोठे विधान  - Ajit Pawar Says I Did not know about Ekanath Khadse NCP Entry Say Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

एकनाथ खडसेंबद्दल अजित पवारांचे मोठे विधान 

सागर आव्हाड
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही, असे विधान पवार यांनी केले

पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही, असे विधान पवार यांनी केले. 

गेले काही दिवस भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी जळगावमध्ये होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, खडसे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या होत्या. नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे पक्षांतर करण्याबाबत ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. मी जळगावात असलो तरी माझी त्यांची भेट झालेली नाही. या विषयावर आपण त्यांच्याशी बोललो नाही. परंतु वेळ आल्यावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, असे फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले होते.

याबाबत अजित पवार यांना आज विचारले असता ते म्हणाले, "जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे.  राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो,''  मी तर सगळ्यांना भेटत असतो. तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता, असेही पवार म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख