पिंपरी : एकही आश्वासन न पाळलेलं राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे पलटूराम सरकार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये केली. केली.वीजमाफी न देणाऱ्या या सरकारला या निवडणुकीत मतांचा शॉक द्या, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना काळात समाजातील कुठल्याही घटकाला राज्य सरकारने एका नव्या पैशाचीही मदत केली नसल्याचा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला. ते म्हणाले, ''या सरकारने गेल्या वर्षभराच्या काळात चालू कामांना फक्त स्थगिती देण्याचे काम केलं. त्यांचा एकच धंदा चाललाय तो म्हणजे बदल्या करा आणि कमवा.त्यासाठी दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. परिणामी या सरकारविरुद्ध जनतेत असंतोष असून त्याचे मतात परिवर्तन करा,'' या नाकर्त्या सरकारला डिस्लाईक करा,तर कोरोनात मोदींनी केलेल्या मदतीचे रुपांतर आपल्या उमेदवाराला मते मिळवून त्याला मतदार लाईक कसे करतील हे पहा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
आपल्या व विरोधी उमेदवाराच्या वयातील तफावत दाखवताना फडणवीस यांनी आपला उमेदवार ४७ वर्षाचा तर विरोधी राष्ट्रवादीचा हा नेमका त्याच्या उलट म्हणजे ७४ वर्षाचा आहे,असं सांगितलं. त्यामुळे आपला उमेदवार पदवीधरांशी कनेक्ट होणारा असल्याने त्याचा आपल्याला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. महापौर माई ढोरे,माजी मंत्री बाळा भेगडे,हर्षवर्धन पाटील,भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे. प्रदेश सचिव अमित गोरखे.प्रदेश सदस्य एकनाथ पवार,सदाशिव खाडे, आ.महेशदादा लांडगे, लक्ष्मणभाऊ जगताप,निरंजन डावखरे,उपमहापौर केशव घोळवे,सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदींसह पक्षाचे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे व इतर नेते यावेळी व्यासपीठावर होते.
Edited By - Amit Golwalkar

