आमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला - Vasant Gite says Due to MLA Pharande i leave BJP. Joine Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार देवयानी फरांदेंच्या उद्योगांना कंटाळून भाजप सोडला

संपत देवगिरे
शनिवार, 9 जानेवारी 2021

भाजप चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे मी त्या पक्षात गेलो.  मात्र स्थानिक नेत्यांची कामे उद्वेगजनक आहेत. आमदार देवयानी फरांदे गुन्हेगारांना संरक्षण देतात. त्याला कंटाळूनच मी भाजप सोडला असेमाजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले. 

नाशिक : भारतीय जनता पक्ष अतिशय चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे मी त्या पक्षात गेलो.  मात्र स्थानिक नेत्यांचे जी कामे सुरु आहेत ती उद्वेगजनक आहेत. शहरातील आमदार देवयानी फरांदे गुन्हेगारांना संरक्षण देतात. त्यांच्यासाठी मोर्चे काढतात. अधिका-यांना दमबाजी करतात. हे भाजपच्या तत्वांत बसणारे नाही. त्याला कंटाळूनच मी भाजप सोडला असे शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे नेते, माजी आमदार वसंत गिते यांनी सांगितले. 

श्री. गिते यांच्यासह सुनिल बागूल यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. श्री. गिते यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला. त्याची राज्यभर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी `सरकारनामा`शी संवाद साधला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष चांगला पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम नेतृत्व भाजपला लाभले आहे. त्यांच्या विनंतीमुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला कोणतेही पद, अधिकाराची अपेक्षा नव्हती. फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी मला प्रदेश उपाध्यक्ष केले. मी नम्रपणे नकार दिला होता. मात्र श्री. फडणवीस म्हणाले, गिरीष महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगले काम करा. लोकांच्या अडचणी सोडवा. विकासाची कामे करा. त्यामुळे मी ते पद स्विकारले. माझ्या परिने पक्षासाठी खुप परिश्रम घेतले. पक्षाचा प्रचार केला. मात्र नागरिक विविध प्रश्न घेऊन येतात. शहराचे प्रश्न असतात. शहरासाठी काम करावे लागतात. स्थानिक नेतृत्वाचा त्यात चांगला दृष्टीकोण नाही. प्रत्येक कामात ते अडथळे आणतात. अडसर निर्माण करायचे. त्या त्रासामुळे मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

आमदारांच्या वर्तणुकीने त्रास

श्री. गिते म्हणाले, शहराच्या आमदार देवयानी फरांदे काय काम करीत आहे, त्यावर पक्षाने लक्ष घातले आहे का. शहरात `डीजे` पार्टीचे प्रकरण घडले. त्यात निष्पाप युवकांवर अत्याचार झाले. त्याचा कोणत्या आमदाराशी संबंध आहे हे सबंध शहराला माहिती आहे. या आमदार गुन्हेगारांसाठी मोर्चे काढतात. पोलिसांना दमबाजी करतात. अधिका-यांशी त्यांचे वागणे उद्दामपणाचे असते. सभागृहाच्या पार्कींगच्या जागेवर त्यांना नियमा बाजुला ठेऊन इमारत बांधायची आहे. अनेक नियमबाह्य कामांचा आग्रह सुरु असतो. याबाबत नागरिक आमच्याकडे येऊन तक्रार करतात. आम्ही त्या नागरिकांना केस तोंड द्यायचे?. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसे करायचे?. या स्थानिक नेत्यांमुळे जर आम्हाला लोकांची कामेच करता येत नसतील तर आम्ही त्या पक्षात राहून करायचे काय?. 

भाजपचे वरिष्ठ नेते चांगले

श्री. गिते यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी आदर व्यक्त केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा दृष्टीकोण, विकास करण्यासाठीचा विचार अतिशय चांगला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सर्व नेते अतिशय चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खुप प्रेम दिले. काम करण्याची संधी दिली. मार्गदर्शन केले. त्याचा मी नेहेमीच ऋणी राहीन. परंतु स्थानिक नेतृत्वामुळे कोंडमारा होत होता. आम्ही उघडपणे लोकांसाठी झगडणारी माणसे आहोत. त्यामुळे भाजप सोडला. शिवसेना पक्षात मी बालपणापासून काम करीत आलो आहे. त्या पक्षाने मला मोठे केले. त्या शिवसेनेत प्रवेश केल्याने मोकळे व आनंदी वाटते आहे.

दरम्यान आमदार देवयांनी फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता, मी बाहेरगावी आहे. या विषयावर मी सविस्तर बोलेन. श्री. गिते यांना काय बोलायचे ते बालु द्या, असे त्यांनी सांगितले.
...  
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख