सदाभाऊ खोत म्हणतात....राजू शेट्टींचा शरद पवारांकडे अभ्यास सुरू आहे'

राजू शेट्टींचे प्रश्‍न राज्य स्तरावरील आणि आंदोलन राष्ट्रीय स्तरावरील असते. ते १४० संघटनांशी संलग्न आहेत. त्यामुळे छोट्या संघटनांची त्यांना आवश्‍यकता नाही, असा टोमणा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मारला आहे.
Raju Shetty Taking Training Under Sharad Pawar Say Sadabhau Khot
Raju Shetty Taking Training Under Sharad Pawar Say Sadabhau Khot

नाशिक : राजू शेट्टी यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे अभ्यास सुरू आहे, त्यांचा अभ्यास झाल्यावर काय होते ते पाहू. राजू शेट्टींचे प्रश्‍न राज्य स्तरावरील आणि आंदोलन राष्ट्रीय स्तरावरील असते. ते १४० संघटनांशी संलग्न आहेत. त्यामुळे छोट्या संघटनांची त्यांना आवश्‍यकता नाही, असा टोमणा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मारला आहे. 

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या झालेल्या हालाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी श्री. खोत यांनी झूमद्वारे राज्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ''खरिपासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बॅंकांविरुद्ध राज्य सरकारने गुन्हे दाखल करावेत, बियाण्यासाठी 50 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील पॅकेजमध्ये काही नसल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे. कोरोना संसर्गात कृषी आणि पणन विभाग अस्तित्वहीन राहिला, असा आरोप त्यांनी केला. 

सुपर इंडियाने कोरोना देशात आणला. अशांसाठी विमानसेवा दिली गेली. मात्र, घाम गाळणाऱ्यांना प्रवासाची व्यवस्था केली गेली नाही, असे सांगून श्री. खोत म्हणाले, "राज्य सरकारने जिल्हानिहाय समन्वय समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी आठवड्यातून दोनदा आमदारांशी संवाद साधला तर समस्या लवकर समजतील आणि त्यावर उपाययोजना करणे सरकारला शक्‍य होईल. त्याचप्रमाणे सरकार जुलैमध्ये शाळा सुरू करायचे म्हणते आहे, परंतु, अडकून पडलेले पालक आपल्या मुलांच्या प्रवेशाबद्दल चिंतित आहेत. त्याचा विचार सरकारने करायला हवा. प्रवेशासाठी सोयीचा कालावधी मिळावा. शारीरिक अंतर ठेवून आश्रमशाळांमधून शिक्षण, निवास, भोजन कसे होणार याची चिंता सरकारने मिटवावी.''

''मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने आता पत्रव्यवहार करीत आहे. शेतकऱ्यांसाठी पीककर्जाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन खरीप पीककर्जाचा विषय पुढे न्यावा. शिखर बॅंकेने सरकारची आणि रिझर्व्ह बॅंकेची मान्यता घेऊन शेतकऱ्यांना थेट पीककर्ज पुरवठा सुरू करावा,'' असेही खोत म्हणाले. 

२० लाख टनांपर्यंत कापूस शिल्लक 

''फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून सरकारने कोरोनाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करावी. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पाहून राजकीय टीकाटिप्पणी थांबवून दुधाला पाच रुपये लिटर, कांद्याला क्विंटलला पाचशे, कापसाला क्विंटलला दोन हजार, कडधान्याला एक हजार रुपयांचे अनुदान सरकारने द्यावे,'' अशी मागणी श्री. खोत यांनी यावेळी केली.

''खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी करूनही त्याची पूर्तता न झाल्याने आठवड्यावर आलेल्या पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडे वीस लाख टनांपर्यंत कापूस शिल्लक आहे. या कापसासाठी भावांतर योजना सरकारने सुरू करावी. फरकाची रक्कम खात्यात वर्ग करावी. शेतकरी त्यांच्या सोयीनुसार कापूस विकतील,'' असेही श्री. खोत यांनी सांगितले. 
.... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com