पोलिस निरीक्षकावर ही वेळ म्हणाले....आम्हालाही माणूस म्हणून वागणूक द्या हो! - Police Inspector Madhukar kad Expressed His Feelings after Recovering from Corona | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस निरीक्षकावर ही वेळ म्हणाले....आम्हालाही माणूस म्हणून वागणूक द्या हो!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

कोरोनाविरोधातील लढा जिंकून दोन दिवसांपूर्वी पुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात रुजू झालो. कर्तव्य महत्वाचे आहे. या भीषण परिस्थितीमध्ये पोलिसच अदृश्‍य कोरोनाशी सरळ लढत देत आहेत. 

नाशिक : कोरोनाविरोधातील लढा जिंकून दोन दिवसांपूर्वी पुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात रुजू झालो. या भीषण परिस्थितीमध्ये पोलिसच अदृश्‍य कोरोनाशी सरळ लढत देत आहेत. पण समाजानेही कोरोनामुक्त झालेल्याना माणुसकीने वागविले पाहिजे, असे मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. नुकतेच ते कोरोनाला पराभूत करुन परतले आहेत.

........लॉकडाऊनमध्ये आम्हीही इतरांसारखेच घरातच बायका-पोरांसोबत बसून राहिलो असतो. पण पोलिसाचे कर्तव्य आणि त्यातही सामाजिक जबाबदारी म्हणूनच कर्तव्यासाठी समाजात वावरलो. त्यातून झाली कोरोनाची लागण. जीवावर बेतले. तरीही त्यावर मात केली. आता कोरोनामुक्त होऊन महिना होत आला, तरीही या काळात जी सामाजिक वागणूक मिळाली, ती शब्दांतही मांडता येत नाही. इतकेच कशाला अजूनही घरात काम करण्यासाठी सहाय्यक मिळत नाही ... पोलिसच रस्त्यावर उतरलेत हे वास्तव असताना त्यांनाच अशी वागणूक समाजाकडून मिळत असेल तर जे कोरोनामुक्त होऊन घरी परतले त्यांची काय वेगळी अवस्था असणार आहे..... ही प्रतिक्रीया आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांची. तथाकथीत समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

 ते पुढे म्हणाले, ''ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्याची जबाबदारी सांभाळतो. मार्च महिन्यात मुंब्रामध्ये कोरोना विषाणू झपाट्याने वाढत होता. दाट लोकवस्ती असल्याने बाधितांची संख्या वाढत गेल्याने लॉक डाउन मध्ये पोलिसांना उतरावे लागेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला थोडा त्रास होऊ लागला. रक्तदाब वाढल्या सारखे वाटले म्हणून पोलीस ठाण्यात असतानाच डॉक्‍टरांना बोलवले. त्यांनी तपासले आणि दोन दिवसांनी त्यांच्यातीलच एक कोरोना बाधित असल्याचे कळले. त्यामुळे मलाही धास्ती वाढली. त्यानंतर लक्षणे दिसू लागली. कुटुंबिय नाशिकरोडला राहते म्हणून घर गाठले. दुसऱ्याच दिवशी (8 एप्रिल) महापालिकेच्या जाकीर हुसैन रुग्णालयात दाखल झालो. स्वॅब घेतले गेले. पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. सुरुवातीला धक्का बसला. दोन दिवसात प्रकृती खालावली. अवयव बाधित होण्याचा धोका वाढल्याने तात्काळ मुंबईच्या रुग्णालयात हलविले गेले. रितसर उपचार होऊन कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.''

''पण, खरी लढाईत सामाजिक अज्ञानाशी सुरू झाली. ती म्हणजे सामाजिक विषाणूची. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत होता, त्यावेळी नाशिकमधीलच परंतु मुंबईत अडकलेल्या अनेकांना नाशिकला पोहोचते केले. एवढेच नव्हे तर काहींना मुंबईमध्ये सुरक्षितस्थळी हलवून त्यांना काय हवे नको, त्याची व्यवस्थाही करून दिली. पण कधी विषमता दाखविली नाही. मात्र जे अनुभव कोरोना झाल्यानंतर आले ते एक भीषण वास्तवच,'' असे त्यांनी व्यथित होऊन सांगितले.
.... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख