राज्य सरकार स्थिर असल्याची छगन भुजबळांनी दिली ग्वाही - Chhagan Bhujbal Says State government is stable | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकार स्थिर असल्याची छगन भुजबळांनी दिली ग्वाही

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 जून 2020

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. तीन पक्ष असल्याने त्यांच्यात काही विषयांत मतभिन्नता असू शकते. याचा संबंध सरकारच्या स्थिरतेशी जोडू नका. राज्य सरकार मजबूत आहे, अशी ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली

नाशिक : महाविकास आगाडीतील घटकपक्ष कॉंग्रेस नाराज असल्याची चर्चा व त्या अनुषंगाने येत असलेल्या बातम्या यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले, की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. तीन पक्ष असल्याने त्यांच्यात काही विषयांत मतभिन्नता असू शकते. याचा संबंध सरकारच्या स्थिरतेशी जोडू नका. राज्य सरकार मजबूत आहे. 

या संदर्भात ते पुढे म्हणाले, ''शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. हे तीन भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष असल्याने त्यांचे विचार, नेते यांच्यात कुरबुरी, वाद असतातच. मतभिन्नता नसेल तर कसे होईल? विकासाचे प्रश्‍न असो, जनतेशी निगडित विषय, प्रशासनाचे कामकाज, राज्य सरकारची धोरणे या सगळ्याच बाबतीत मतांतरे असतात. यामध्ये काहीही नवे नाही. यापूर्वीही असे घडले आहे. याचा अर्थ आमच्यात वैचारिक मतभेद आहेत असे नाही. आम्ही वैचारिकदृष्ट्या एकत्र आहोत. जे प्रश्‍न असतील ते वरिष्ठ नेते एकत्र बसून त्यात मार्ग काढतील. याचा अर्थ सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल, अशा चर्चा, अफवा कोणीही पसरवू नये. राज्यातील सरकार मजबूतच आहे. कोणीही काळजी करू नये,"

संबंधित लेख