काम चुकारांना घरी पाठविण्यासाठी गडकरींनी नारळाचं पोतचं मागवलं होतं... - Performance audit should be done says Union Minister Nitin Gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

काम चुकारांना घरी पाठविण्यासाठी गडकरींनी नारळाचं पोतचं मागवलं होतं...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

किती लोकांना निलंबित केलं, किती जणांना व्हिआरएस घ्यायला लावली, याचं रेकॅार्ड करायचं आहे,'' असेही गडकरी म्हणाले.

नागपूर : ''कल्याणकारी राज्यात अधिकाऱ्यांकडे सकारात्मकता असली पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, भष्ट्राचारमुक्त प्रशासकीय यंत्रणा हवी.  गुणवत्तेशी कटीबद्धता असली पाहिजे, प्रत्येकाला काम आणि प्रत्येक कामाला योग्य व्यक्ती असली पाहिजे. त्या व्यक्तीचं फायनाशिल ऑडिट नाही झालं तरी चालेल, पण  परफॉर्मेंस ऑडिट  झालं पाहिजे,'' असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांचे ‘आयएएसची पाऊलवाट’या पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन नुकतेच झाले, या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. याप्रसंगी डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि विश्वकर्मा प्रकाशनचे विशाल सोनी ऑनलाईन उपस्थित होते. 

''प्रशासनात काम करीत असताना सकारात्मकता फार महत्वाची असते. गरीबांना मदत करीत असताना एखाद्या वेळी कायदा मोडू नका, पण कायदा वाकवला तरी चालतो. शेवटी कायदा हा जनतेसाठी असतो. महात्मा गांधीजींनी सांगितले आहे की कायदा हा गरीब, शोषितांच्या हिताकरीता असतो.  गरीब माणसांचा फायदा होत असेल तर मी एकदा नाही हजारवेळा कायदा तोडायला तयार आहे. कायदा स्वतःकरीता किंवा कोणाच्या स्वार्थाकरीता तोडता कामा नये,'' असेही गडकरी म्हणाले.

गडकरी जेव्हा रात्रीच्या वेळी बँकेतून ३५ लाख रुपये काढतात...

गडकरी म्हणाले, ''एमएससीबीमध्ये एक एक योजना पूर्ण व्हायला पाच ते सहा वर्ष लागतात. हे पाहून माझं रक्त खवळलं. मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं की एक पोतं नारळं घेऊन या. आणि शंभर व्हिआरएस प्रमाणपत्र टाइप करून ठेवा. तीन महिन्याच्या आत जर योजना मंजूर झाली नाही, तर अशा कामचुकार अधिकाऱ्यांच्या हातात नारळ द्या. त्यांना स्वेच्छानिवृत्ती द्या. त्यांना घरी पाठवा.. तूम्हाला जर तीन महिन्यात योजना पास करता येत नसेल तर तुम्ही  गांडूळखंत निर्माण करण्याच्या लायकीचे देखील नाहीत. हे केल्यानंतर सर्व यंत्रणा बदलून गेली. अनेकांना रोजगार मिळाला.''

''आता माझं खूप नाव झाले. अनेक रस्ते बनले. वर्ल्ड रेकॅार्ड झालं. आता किती लोकांना निलंबित केलं, किती जणांना व्हिआरएस घ्यायला लावली, याचं रेकॅार्ड करायचं आहे,'' असेही गडकरी म्हणाले.

गडकरी म्हणाले की, संकेत भोंडवे हे संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व  आहे. त्यांना संस्काराचे बाळकडू त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.  दिव्यांग, अपंग, निराधार यांना आपल्या परिवाराचे एक घटक आहेत, असे समजून राजकीय नेत्यांनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वागण्याची गरज आहे.  
 
पी.डी.पाटील म्हणाले की, नाविन्यपूर्ण प्रकल्प करण्याचे क्षमता संकेत यांच्यात आहे. हा विद्यार्थी आयएएस होणार हे लहानपणी शिक्षकांच्या लक्षात आले होते, कारण संकेत यांनी त्यांच्या घराच्या दारावर 'संकेत भोंडवे, आयएएस' असे लिहिले होतं. 
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख