विनायक राऊत विकृत आहेत - नीलेश राणेंची टीका - Vinayak Raut is Sadistic Criticizes Nilesh Rane | Politics Marathi News - Sarkarnama

विनायक राऊत विकृत आहेत - नीलेश राणेंची टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

चिपळूण येथे खासदार राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला नीलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी सध्या ते रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्‍यात दौऱ्यावर आहेत

रत्नागिरी :  निवडणूक ग्रामपंचायतीची आणि टीका राणेंवर या विषयावरूनच शिवसेनेने ग्रामपंचायत पातळीवर काहीच विकासकामे केलेली नाहीत, हेच स्पष्ट होते. विनायक राऊतांनी फक्‍त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे.

चिपळूण येथे खासदार राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला नीलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी सध्या ते रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्‍यात दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, ''स्वतः काहीच केले नाही, पण दुसरा करतोय, ते पाहवत नाही. राऊतांना राणे नको, नाणार नको. यांच्यामुळेच महामार्गात घोळ झालेला आहे. राऊतांनी एक जरी विकासकाम केले असते, तर आज राणेंवर टीका करायची गरज पडली नसती. शिवसेनेत जे काय चालले आहे, त्यामुळे प्रतिमा बिघडलीय. अनेकजणं निवडून येतील की नाही, याची भीती वाटत आहे. विकासकामांमध्ये शिवसेना नापास झालेली आहे,''

गावागावात गाठीभेटींचे सत्र
पालकमंत्री, खासदार, आमदारांनी रत्नागिरी जिल्हा दिवाळखोरीत नेला आहे. प्रत्येक गावागावांत रस्ते खराब आहेत; मात्र शासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, अशी टीकाही नीलेश राणे यांनी केली आहे. नीलेश राणे यांनी रत्नागिरी तालुक्‍यातील बसणी, वाटद, खंडाळा, नेवरे, वरवडे, चाफे, जाकादेवी, खेडशी या गावात गावभेटी घेऊन उमेदवार, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांना निवडणूक अनुषंगाने मार्गदर्शन व सूचना दिल्या.

राउतांनी बालवाडी तरी आणली का?
ते म्हणाले, कोकणात राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. विनायक राउतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना फक्‍त राणेंवर बोलण्यासाठीच पाठवले आहे. त्या पलीकडे त्यांची पात्रता नाही. मागील निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे निवडून आले होते. ज्यांनी काहीच केलेले नाही, ते मेडिकल कॉलेज, शिक्षण संस्थेबद्दल कसे चांगले बोलणार.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख