..पैशांची ताकद लावून सरकारे पाडणे ही 'त्यांची' लोकशाही - उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray Criticizes BJP over Money Politics | Politics Marathi News - Sarkarnama

..पैशांची ताकद लावून सरकारे पाडणे ही 'त्यांची' लोकशाही - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

इथलं आमचं सरकार हे लोकशाहीविरोधी आहे आणि पैसे देऊन फोडून तिथे आणणारं सरकार हे लोकशाहीला धरून आहे. ही यांची लोकशाहीची व्याख्या आहे, अशी  टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना' ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर केली आहे

मुंबई : राजस्थानचं सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असताना काँगेसचे बंडखोर नेते आणि भाजपचे काही नेते यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीसंदर्भातल्या काही टेप्स समोर आल्या, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ही त्यांची लोकशाही आहे, असा वार त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस. त्या निमित्ताने 'सामना'चे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी राज्याबरोबरच देशात सुरु असलेल्या राजकारणाचा आढावा घेतला. राजस्थान व मध्य प्रदेशातल्या घडामोंडींबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, "ते दुसरं करू काय शकतात? लोकशाही आहे ना ही त्यांची. म्हणजे इथलं आमचं सरकार हे लोकशाहीविरोधी आहे आणि पैसे देऊन फोडून तिथे आणणारं सरकार हे लोकशाहीला धरून आहे. ही यांची लोकशाहीची व्याख्या आहे. शिवसेनाप्रमुखांना लोकशाहीची थट्टाच  मान्य नव्हती. म्हणून ते म्हणायचे, ही तुमची असली दळभद्री लोकशाही. ही असली. हे मला मान्य नाही,"

हा जो पैशांचा वापर राजकारणात वाढतोय यावर विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, ''पैशांचा असा वापर केला तर त्यांच्या दृष्टीने तो गुन्हा होत नाही. पण तुमच्या कोणी विरोधात असेल तर त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावला जातो. सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात ठेवायला हवे. दिवस बदलत असतात. आपण म्हणतो ना, हेही दिवस जातील. सगळेच दिवस जात असतात,''

मध्य प्रदेशात काँगेसचं सरकार पाडले. तो प्रयत्न  राजस्थानात यशस्वी झाला नाही, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, "तिकडे कदाचित कोरोनाची स्थिती वाईट नसावी किंवा कोरोनाची साथ पोहोचलेली नसावी. कारण इथल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल गृहमंत्र्यांकडे किंवा दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेत्यांनी तक्रार केली तर हीच साथ जी जगात पसरली ती केवळ महाराष्ट्रातच असेल, मध्य प्रदेशात नसेल, राजस्थानात नसेल,''

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख