'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह - Shivsena MP Sanjay Raut Questions NCP Probe | Politics Marathi News - Sarkarnama

'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

बिहार निवडणुकीसाठी विकासाचा मुद्दा नसल्याने अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा प्रचाराचा मुद्दा असावा. म्हणूनच केंद्र आणि बिहार सरकारने हे सर्व घडवून आणले आहे. जेडीयूने तर आता भित्तीपत्रकेही छापली आहेत. सीबीआय करत असलेला तपास कुठे पोहचला आहे, असा प्रश्‍न आता मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी बिहारच्या पोलिस आणि राजकारण्यांना विचारायला हवा, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले

मुंबई  : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी) आहे. पण हा विभाग स्वत:हून स्थानिक पातळीवर तपास करत आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या विभागाच्या तपासावर प्रश्‍न निर्माण करत बिहारमध्ये जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकांवरही  प्रश्‍न उपस्थित केला आहे.

बिहारमध्ये कोरोना संपला आहे का? तसे असेल तर जाहीर तरी करावे, असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले. ते म्हणाले, "बिहार निवडणुकीसाठी विकासाचा मुद्दा नसल्याने अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा प्रचाराचा मुद्दा असावा. म्हणूनच केंद्र आणि बिहार सरकारने हे सर्व घडवून आणले आहे. जेडीयूने तर आता भित्तीपत्रकेही छापली आहेत. सीबीआय करत असलेला तपास कुठे पोहचला आहे, असा प्रश्‍न आता मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी बिहारच्या पोलिस आणि राजकारण्यांना विचारायला हवा. सीबीआय आता कोठेच दिसत नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव रुग्णालयात आहेत. कॉंग्रेसची तेथे फारशी ताकद नाही. अशा परिस्थितीत भाजप-जेडीयू एकाकी निवडणूक लढणार का, असा प्रश्न आहे."

उत्तर प्रदेशातील चित्रपट नगरीमुळे फरक नाही
उत्तर प्रदेशात चित्रपट नगरी उभारली जात आहे. त्याबद्दल राऊत म्हणाले, फिल्मसिटी उत्तर प्रदेशात गेल्यास मुंबईचे वलय कमी होणार नाही. चित्रीकरण परदेशातही होते. त्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी झाले नाही, असे संजय राऊत म्हणाले.

बंगल्यावरील कारवाईत भूमिका नाही
मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली असेल. कंगना प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही. तरीही न्यायालयात भूमिका मांडेन, असेही राऊत यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख