'या' साठी दिला होता २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा : शरद पवारांचा गौप्यस्फोट - Sharad Pawar Explains why we Supported BJP in the Past in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

'या' साठी दिला होता २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा : शरद पवारांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

२०१९ मध्ये महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी जन्माला आली त्याची बीजे २०१४ मध्येच रोवली गेली होती. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्यामागे भाजप व सेनेत फूट पाडण्याचा हेतू होता. भाजपचे सरकार त्यावेळी स्थापन झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे

मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात फूट पाडण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी ही माहिती दिली. 

"२०१९ मध्ये महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी जन्माला आली त्याची बीजे २०१४ मध्येच रोवली गेली होती. त्यावेळी भाजपला पाठिंबा देण्यामागे भाजप व सेनेत फूट पाडण्याचा हेतू होता. भाजपचे सरकार त्यावेळी स्थापन झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती,'' असे पवार यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक मध्ये जे काही केले तसे महाराष्ट्रात घडू शकते काय असे विचारले असता पवार म्हणाले, "त्यांनी तसा प्रयत्न करुन पहावा. महाराष्ट्रातली महाविकास आघाडी जिब्राल्टरच्या खडकाएवढीच अभेद्य आहे,"

यापूर्वीही केंद्रात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार होते. पण त्यावेळी कुठल्या राज्यांचे सरकार अस्थीर करण्याचा प्रयत्न झाला नव्हता, असेही पवार म्हणाले. "मात्र आताच्या सरकारची मानसिकता वेगळी दिसते. मात्र संघराज्य पद्धतीत लोकांचे कल्याण हाच अंतीम हेतू हवा. कुठल्या राज्याचे सरकार अस्थिर करुन हे उद्दीष्ट साधता येणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे'', असेही पवार यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच समन्यवयाचा अभाव आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, "यात काहीही तथ्य नाही. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि समन्वयाचाही अभाव नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही चर्चा केलेली नाही. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव गृहखात्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला होता व त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला,"

पुढील निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार काय असे विचारले असता पवार म्हणाले, "कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. आम्ही पुढील काळात एकत्रित लढलो तर निश्चितच राज्याला चांगले व भक्कम सरकार आम्ही देऊ शकू,"
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख