Sharad Pawar - Anil Deshmukh
Sharad Pawar - Anil Deshmukh

देशमुख - वाझे भेटलेच नाहीत; शरद पवारांनी केली पाठराखण

निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांनी फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती, हा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे

नवी दिल्ली : निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांनी फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती, हा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेटाळून लावला आहे. फेब्रुवारी महिन्यान देशमुख व वाझे यांची भेट झालीच नाही, असे पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले. (Sharad Pawar Backs Anil Deshmukh In Parambir Singh Letter Issue)

देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबईतल्या रेस्टाॅरंट्स, डान्स बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यावरुन राजकीय धुरळा उडाला आहे. विरोधी पक्ष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण केली. पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लेटरबाँब प्रकरणात रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, असे काल सूचित केले होते. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला १०० कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत १ हजार ७५० बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून ४० ते ५० कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे सांगितल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. (Sharad Pawar Backs Anil Deshmukh In Parambir Singh Letter Issue)

याबाबत आज बोलताना पवार म्हणाले की ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग म्हणतात तशी वाझे व देशमुख यांची भेटच झाली नाही. परमबीर सिंग महिनाभर शांत का बसले असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. ज्या काळासाठीचा हा आरोप होता त्या काळातले अनिल देशमुखांचे सर्व कार्यक्रम मी पाहिले आहेत. जयंत पाटीलही अधिक माहिती घेऊन मला भेटले. सर्व माहिती मी तपासली आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हे आज ना उद्या उघड होणारच आहे. एटीएसचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com