'न्यू इयर' ला कर्फ्यू-लाॅकडाऊन नाही? मुख्यमंत्र्यांचे संकेत

नव वर्षाचे स्वागत करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात नाईट कर्फ्यू किंवा लाॅकडाऊन लावा, असे काही तज्ज्ञ मला सांगत आहेत. पण तसे न करता लोकांनी कोरोनाचा विषाणू पसरू नये, म्हणून काळजी घ्यावी. संयम बाळगून परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : नव वर्षाचे स्वागत करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात नाईट कर्फ्यू किंवा लाॅकडाऊन लावा, असे काही तज्ज्ञ मला सांगत आहेत. पण तसे न करता लोकांनी कोरोनाचा विषाणू पसरू नये, म्हणून काळजी घ्यावी. संयम बाळगून परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात त्यांनी नाईट कर्फ्यू किंवा लाॅकडाऊन न लावण्याचे संकेत दिली. गेल्या वर्षभरातील कोरोना स्थितीचा थोडक्यात आढावा घेत मुख्यमंत्री म्हणाले, "आपण कोरोनाची साथ संयमाने कमी केली. साथीचे इतर आजार आले नाहीत. लाॅकडाऊन असल्याने उन्हाळी किंवा पावसाळी आजारांच्या साथी आल्या नाहीत. पण आता सर्व काही सुरु झाले आहे. त्यामुळे हिवाळ्यातील रोगांच्या साथी येण्याची शक्यता आहे,''

ते पुढे म्हणाले, "युरोपिय देशांमध्ये टायर-४ चा अत्यंत कडक लाॅकडाऊन लावावा लागला आहे. कोरोना तिकडे आपला अवतार बदलतो आहे, अशी बातमी आहे. आधीच्या विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अधिक झपाट्याने पसरतो आहे, असे दिसते आहे. काळाप्रमाणे हा विषाणूही बदलला आहे. त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे आपण त्यातून काही गोष्टी शिकायला हव्यात. याचसाठी आपण धीम्या गतीने जात आहोत. परदेशातून येणाऱ्यांच्या चाचण्या थांबवता येणार नाहीत. आधी झाली ती चूक आता करुन चालणार नाही,"

''नव्या वर्षाच्या सुरुवातीस नाईट कर्फ्यू करा. लाॅकडाऊन करा असे तज्ज्ञ सांगताहेत. हे करायचे का? अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लाॅकडाऊन आपण कायद्याने लावू शकतो. मात्र, सत्तर टक्के लोक चेहेऱ्यावर मास्क घालत आहेत. काळजी घेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ही बंधने पाळायला हवीत. अजूनही सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नसाल तर ते वापरा. ते शस्त्र आहे. नव्या वर्षाचे स्वागत करताना सावध रहा. लग्नसराईमध्येसुद्धा सावध रहा. लग्नसराईचे दिवस येत आहेत. लग्नात गर्दी वाढते आहे. पण जरा अंतर ठेवा,''असेही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. शाळा उघडायच्या का? हा प्रश्न आहे. आपण धीम्या गतीने जातो आहोत. आपण ही पथ्ये पाळली व कोरोनाचा जोर खाली आणला तर शाळासुद्धा बिनधोकपणाने उघडता येतील, असेही ते म्हणाले.  

कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या कामगिरीचाही आढावा ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले, "गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. अनेक जण डोळे लावून बसले होते की सरकार पडेल. पण वर्ष पूर्ण करताना जगात शंभर वर्षांपूर्वी जी परिस्थिती आली होती, तशा परिस्थितीचा सामना करत, राजकीय हल्ले परतवत राज्याचा विकास केला आहे. मी विकास कामांची पाहणी सुरु केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. येत्या १ मे पासून नागपूर ते शिर्डी टप्पा सुरु करतो आहोत. जानेवारी महिन्यात सिंधूदुर्ग विमानतळ खुला करण्याचा प्रयत्न आहे. कोयनेचे धरण पाहून आलो. मुंबई कोस्टल रोड पाहिला,"

"सरकार नक्की काय करते आहे हे समजण्यासाठी मी हे सगळे सांगतो आहे. निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातला पूर, कापसाची खरेदी जे जे शक्य असेल ते करतो आहोत. आर्थिक चणचण आहे. आर्थिक चणचण असताना केंद्राकडून येणारे पैसे बाकी आहेत. तरी एकेक पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या महाराष्ट्राने जी प्रतिमा केली आहे त्यातून काही हजारो कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. जून जुलैत करार झाले त्यातले ७० टक्के काम पूर्ण झाले आहे,'' असे सांगतानाच मी जुन्या कामांना स्थगिती देतोय का हे प्रकल्प पुढे नेतोय, हे एकदा विरोधकांनी ठरवावे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com