..तर रामदेवबाबां विरुद्ध गुन्हा दाखल करु : अनिल देशमुख (व्हिडिओ) - Maharasthra Home Minister Warns Ramdev Baba | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

..तर रामदेवबाबां विरुद्ध गुन्हा दाखल करु : अनिल देशमुख (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 जून 2020

महाराष्ट्रात कोरोनावर औषध सापडले असे सांगून पतंजलीने संबंधित औषध विक्री केली किंवा त्याची जाहिरात केली तर नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली. 

मुंबई  : योगगुरु बाबा रामदेवबाबा यांच्या पतंजली या कंपनीने कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, हा दावा चुकीचा आहे हे नंतर समजले. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये पतंजली विरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनावर औषध सापडले असे सांगून त्यांनी संबंधित औषध विक्री केली किंवा त्याची जाहिरात केली तर नियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना दिली. 

योगगुरु रामदेवबाबा यांनी दावा केलेले कोरोनावरील औषध हे केवळ प्रतिकारशक्ती वाढविणारे आणि ताप व खोकल्यावरील असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाने दिलेल्या माहितीतून हे सत्य समोर आले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता देशमुख यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. 

पतंजलीने या औषधासाठी अर्ज करताना केवळ प्रतिकारशक्ती आणि ताप-खोकल्यावरील असे म्हटले होते, असेही उघड झाले आहे. याविषयी उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीने केलेल्या अर्जानुसार त्यांना औषधाचा परवाना देण्यात आला. त्यांनी केलेल्या अर्जात हे औषध कोरोना विषाणूवरील आहे, असा कोठेही उल्लेख नव्हता. आम्ही केवळ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि ताप व खोकल्यासाठी या औषधाला परवानगी दिली आहे. त्यांनी कोरोनावरील औषधाचा दावा कशा प्रकारे केला याबद्दल विचारणा करणारी नोटीस आम्ही  पतंजलीला पाठविणार आहोत.

आयुष मंत्रालयाने झटकले हात

रामदेवबाबा  यांच्या पतंजली संस्थेने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला असून, त्याची जाहिरातही  सुरू केली. या औषधातील घटक आणि चाचण्यांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने अखेर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आयुष मंत्रालयाने या औषधाबाबात हात झटकले आहेत. या औषधातील घटकाची पूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत त्याची कोरोनावरील औषध अशी जाहिरात करु नये, असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत. 

पतंजलीने आज कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल आणि श्‍वासारी अशी या औषधांची नावे आहेत. पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार, देशात २८० रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. या औषधाच्या दोन टप्प्यांत चाचण्या घेण्यात आल्या होत्या. पतंजली संशोधन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि निम्स विद्यापीठ, जयपूर या संस्थांनी एकत्र येऊन या औषधांसाठी संशोधन केले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख