सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच बिहारचे अधिकारी क्वारंटाईन : राम कदम (व्हिडिओ) - Maharashtra Government Hiding Facts in SSR Case Alleges Ram Kadam | Politics Marathi News - Sarkarnama

सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच बिहारचे अधिकारी क्वारंटाईन : राम कदम (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलेले आयपीएस अधिकारी बिनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे

मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची भूमिका सुरूवातीपासून संशयाची आहे. महाराष्ट्र सरकार काही गोष्टी जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवत आहे. या प्रकरणातले सत्य बाहेर येईल, या भितीनेच बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. 

बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात बिहारमध्ये दाखल झालेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलेले आयपीएस अधिकारी बिनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तिवारी यांना देशांतर्गत विमान वाहतुकीबाबतच्या नियमांनुसार क्वारंटाईन करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. आयपीएस अधिकारी तिवारी काल पाटण्याहून मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांना बृहन्मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने क्वारंटाईन केल्याचे बिहार पोलिसांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

याबाबत प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, "या आधीची बिहारचे पोलिस आले. रोज हजारो लोक मुंबईत येत आहेत. त्यांच्यापैकी कुणाला क्वारंटाईन नाही केले. मोठे अधिकारी येऊन या प्रकरणाच्या मुळाशी जातील व सत्य समोर आणतील या भितीपोटी त्यांना क्वारंटाईन केले गेले आहे.  महाराष्ट्राचे सरकार मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करु देत नाही. तसे करु दिले असते तर सीबीआयला प्रकरण सोपवा अशी मागणीच झाली नसती,'' 

''थोडक्यात मुंबई पोलिसांना काम करु द्यायचं नाही. बिहारच्या पोलिसांना सहकार्य करायचे नाही. सीबीआयला हे प्रकरण सोपवा ही देशभरातल्या लोकांची मागणी आहे, ती सुद्धा मान्य करायची नाही. महाराष्ट्र सरकारला नेमके कोणते सत्य दडवायचे आहे. मृत्युच्या आदल्या दिवशी सुशांतच्या घरी पार्टी झाली. त्याला महाराष्ट्र शासनाचे काही बडे मंत्री उपस्थित होते, हे समोर येत आहे. नेमके खरे काय ते देशाला, महाराष्ट्राला कधी कळणार,'' असाही सवाल राम कदम यांनी उपस्थित केला. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख