नांव रामाचे, कृती नथुरामाची : जयंत पाटील यांचा भाजपला टोला - Jayant Patil Lashes out at BJP over UP Incident | Politics Marathi News - Sarkarnama

नांव रामाचे, कृती नथुरामाची : जयंत पाटील यांचा भाजपला टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची... रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे, असा जोरदार टोला लगावतानाच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.

हाथरसमधील पीडीत मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये झालेली धक्काबुक्की आणि ताब्यात घेण्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. राष्ट्रीय नेत्यांना अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला तेथील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे कदम यांनी म्हटले आहे. डॉ. कदम म्हणाले की, "कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजीरवाणा नमुना आहे.

राहुल आणि प्रियांका गांधी हे दोघेही उत्तर प्रदेश मधील दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांना अटकाव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे आहे. सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या देशामधील आणि उत्तर प्रदेशमधील जुलमी राजसत्तेला जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला आहे.' 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख