मिळतंय ते घेऊन सरकारमध्ये राहू असे कुणी समजू नये : अशोक चव्हाण - EX CM Ashok Chavan Interview about Relations with Shivsena and Congress | Politics Marathi News - Sarkarnama

मिळतंय ते घेऊन सरकारमध्ये राहू असे कुणी समजू नये : अशोक चव्हाण

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 17 जून 2020

कोरोनामुळे आलेला आर्थिक ताण सहन करायचा असेल तर  कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सुचवलेल्या न्याय योजनेप्रमाणे गरजूंना मदत देणे आवश्यक आहे ही भूमिका कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुलाखतीत सांगितले

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच आम्हाला भेटीची वेळ देतील. त्यांच्या कौटुंबिक हानीची कल्पना आम्हाला आहे. मात्र, त्यांना आमच्या प्रशासकीय अनुभवाची मदत हवी असेल तर आम्ही त्यांना सर्व सहकार्य आमची तयारी आहे, असे कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. आम्हाला मिळतंय ते घेऊन आम्ही सरकारमध्ये राहू असे कुणी समजू नये, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोरोनामुळे आलेला आर्थिक ताण सहन करायचा असेल तर  कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सुचवलेल्या न्याय योजनेप्रमाणे गरजूंना मदत देणे आवश्यक आहे ही भूमिका कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र मृत्युचे प्रमाण चिंताजनक आहे, याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली.  

'सामना'त टिका येतेच
.
दैनिक "सामना'ने आज कॉंग्रेसवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना ते म्हणाले, 'सामना'त टीका नेहमीच येत असते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली की त्याबाबतचे मुद्दे स्पष्ट होतील, असे दैनिक 'सामना'त आलेल्या काँग्रेसवरील टिकेबाबत ते म्हणाले. 

तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांची भेट नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व आपली चर्चा होते काय व राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, यावर बोलताना चव्हाण म्हणाले, "गेले तीन महिने परिस्थिती वेगळीच आहे. त्यामुळे आमची व त्यांची भेट झाली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांना राजकीय अनुभव निश्तिच आहे. परंतु, प्रशासनाबाबत कॉंग्रेस म्हणून आम्हाला किंवा माजी मुख्यमंत्री या नात्याने मला त्यांनी काही विचारल्यास मी जरूर काही गोष्टी सांगेन. आम्ही त्यांना योग्य वाटत असल्यास  मदत करायला तयार आहोत.  प्रशासनात काही बदल गरजेचे आहेत. मी अधिकाऱ्यांबाबत बोलत नाही; पण आरोग्यव्यवस्थेत निश्चित बदल करायला हवेत,"

गरिबांना रोख पैसे द्यावेत

गरिबांचे कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी  राहुल गांधींनी काही उपाय सुचवले आहेत काय याबाबत ते म्हणाले, "कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात  गरिबांसाठी न्याय ही योजना मांडली होती. ती महाराष्ट्रात लागू करावी, गरिबांना रोख पैसे द्यावेत, अशी आमची मागणी आहे. आम्ही ही मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत. कोरोना आजाराला परतवता येते. मात्र सामना करण्यासाठी जिद्द आवश्‍यक आहे, त्यामुळे कुणी घाबरुन जाऊ नये असे त्यांनी स्वतःच्या 'कोरोना' दिवसांबद्दल सांगितले. 

मुंबईत अमुलाग्र बदल हवेत

मुंबईच्या सध्याच्या अवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, " काही आमूलाग्र बदल या शहरात होण्याची गरज असल्याचे कोरोनाच्या साथीतून दिसले आहे. येथील निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे या सर्व मुद्यांवर विचार व्हायला हवा आहे. मुंबईत झोपड्या आणि चाळींमध्ये राहाणाऱ्या गरिबांचे आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान बदलण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे," मुंबई, महाराष्ट्रात कोरोनाने बरेच मृत्यू झाले आहेत. आरोग्यसेवेतील कर्मचारी कमी झाल्याने हा परिणाम झाला असणे शक्य आहे. मात्र आता वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात सुरू झाल्याने आरोग्य कर्मचारी वाढतील आणि मृत्यूदर कमी होईल, अशी आशा करायला वाव आहे, असेही ते म्हणाले.

..तर महापालिकेतही आघाडीचा विचार करु

कॉंग्रेसचे बलस्थान असलेल्या जागा आम्हाला देण्याचा निर्णय घेतल्यास मुंबई महापालिकेत राज्याप्रमाणेच शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा विचार करता येईल, असे चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. "महाविकास आघाडी ही समसमान वाटपाच्या तत्त्वावर झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी आम्हाला चार जागा मिळायला हव्यात. भाजपविरोधासाठी आम्ही जे मिळतेय ते घेत या सरकारमध्ये राहू, असे कुणी समजू नये. आम्ही मदतीला तयार आहोत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम करतील, यावर आम्ही विश्वास ठेऊ," असेही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख