मुंबई : माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष पद, पक्षाचा विधिमंडळ नेता आणि महसूल मंत्री अशी तीन पदं आहेत. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा ऑक्टोबर महिन्यातच व्यक्त केली होती, असे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्त्वात बदल होणार, हे निश्चित झाले आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बदलल्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. बाळासाहेब थोरात येत्या एक दोन दिवसांत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार, अशी जोरदार चर्चा कालपासून सुरु आहे. त्यातच थोरात दिल्लीला गेल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले. याबाबत थोरात म्हणाले, "दिल्लीमध्ये गेल्यावर मला मला माझ्या राजीनाम्याच्या चर्चेबाबत समजले. सध्या माझ्याकडे तीन पदे आहेत. विधीमंडळ नेते,महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. मात्र जबाबदारी वाढत असल्यामुळे मला वाटतंय आणि मी स्वत: या मताचा आहे की तरूणांना संधी द्यायला हवी. पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल, राज्यभर फिरेल अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करा असं मी पूर्वीच सांगितलं आहे,''
आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे.आज चर्चा होणार आहे. अजेंडा माहीत नाही. मात्र लवकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होईल. आता पक्षांतर्गत या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे, असेही थोरात यांनी सांगितले.
मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे नको, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीला आता जोर आला आहे. बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीत महसूलमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा, अशी मागणी येत आहे. थोरात यांच्या जागी राजीव सातव, विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले किंवा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांवाची चर्चा आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा जगताप यांनी दिला आहे. दुसरीकडे राज्यातल्या महाविकास आघाडीचा भाग असलेली काँग्रेस नाराज आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला गृहित धरले जात असल्याची चर्चा अधूनमधून या पक्षाचे नेते करतात. शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली गेली होती. त्यावरुनही काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची भूमीका अधिक आक्रमकपणे मांडली जावी, अशी नेत्यांची इच्छा आहे.
Edited By - Amit Golwalkar

