सुशांतसिंह प्रकरणी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’: सचिन सावंत यांचा सवाल - Congress Leader Sachin Sawant Asks why CBI silent on Sushantsinh Case | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरणी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’: सचिन सावंत यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

सीबीआय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे ? का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करु नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही, कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. यावर, ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्न विचारत सचिन सावंत पुढे म्हणाले, "सीबीआय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे ? का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करु नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत. सुशांत प्रकरणात राजकारण केले जात असून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत,'' 

ते पुढे म्हणाले, "मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला यावर सुप्रिम कोर्टने शिक्कामोर्तब केले होते. कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचीच पुष्टी एम्सच्या पॅनलनेही केली आणि सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजपा’ तोंडावर आपटला.   
सुशांतसिंहच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्यासाठीच सीबीआयसह तीन तीन केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला हे आता सिद्ध झाले आहे," त्यांचा कुटील डाव त्यांच्यावर उलटल्याने सीबीआयला गप्प राहण्यास सांगितले असावे, असेही सावंत म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख