CM Uddhav Thackeray Interview to Sanjay Raut | Sarkarnama

राज्याचे सरकार तीन चाकी रिक्षाच- पण स्टिअरिंग माझ्याच हाती - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवार, दि. २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. शिवसेनेचे युवा नेते म्हणून राजकारणात पाऊल टाकणारे उद्धव ठाकरे उद्या वयाच्या 'साठी'त पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी घेतली

मुंबई : ज्या कुणाला माझे सरकार पाडायचे आहे त्यांनी ते आजच पाडावे! आत्ता ही मुलाखत सुरू असतानाच पाडा. मग बघतो मी!, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून दिले आहे. माझ्या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षाच्या हातात नाही, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. आपले सरकार ही तीनचाकी रिक्षा असली तरी तिचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक जोरदार आव्हान दिले, ‘‘ज्या कुणाला माझे सरकार पाडायचे आहे त्यांनी ते आजच पाडावे! आत्ता ही मुलाखत सुरू असतानाच पाडा. मग बघतो मी!’’ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘सामना’त प्रसिद्ध होणाऱया मुलाखतीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली व अनेक विषयांवरील जळमटे दूर झाली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पण त्यातून मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मंत्रालयाचे सचिवालय झालेले नाही. नोकरशाही सरकारी आदेशाचेच पालन करीत आहे, असे ते ठामपणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी एक सत्य मोकळेपणाने मान्य केले. सरकार तीनचाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची. स्टिअरिंग माझ्या हातात, पण पाठीमागे दोघे बसले आहेत! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवार, दि. २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. शिवसेनेचे युवा नेते म्हणून राजकारणात पाऊल टाकणारे उद्धव ठाकरे उद्या वयाच्या 'साठी'त पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी घेतली. या निमित्ताने त्यांनी राज्यातले राजकारण ते राज्यापुढच्या समस्या यांचा आढावा घेतला. 

मी रिक्षाच निवडेन

मनमोहन सिंग एकदा त्राग्याने म्हणाले होते, मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे. मर्यादा असतात. आपलंही तसं मत आहे का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, " मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे त्यांना मर्यादेचं भान होते. मला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. हे तीन चाकी रिक्षासारखे सरकार आहे असे म्हटले जाते. पण बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन,''

एनडीए सरकार ही रेल्वेगाडी

ते पुढे म्हणाले,  ''ही माझी भूमिका मी बदलत नाही. आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. असा समज कुणी करुन घेऊ नये.  मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन, एवढेच मी म्हणतो आहे. बुलेट ट्रेन नको हे माझे मतआहेच, पण आतासुद्धा सगळ्यांना बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं. ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर ३०-२५ चाकं होती. म्हणजे ती एक रेल्वेगाडी होती,''

पवार यांच्याशी माझा चांगला संवाद

मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देतात या प्रश्नावर ते म्हणाले, '' त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही.शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात. म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची ती चूक आहे, अशातला भाग नाही. तशा आशा अपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीय.  माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो."

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले,''त्यांच्या सोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा काही कामं घेऊन येतात असं अजिबात नाही. कधी कधी त्यांचा फोन येतो की, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळा मग सगळं जुळत असेल तर त्यांची आणि माझी भेट होते. भेटीत ते त्यांचे जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं हे सांगतात. चीनचा विषय निघाला की त्यावर बोलतात. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव सांगतात. चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली, यावर प्रकाश टाकतात,''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख