मुंबई : शहरांना एक इतिहास असतो. त्यांची नावे बदलून काय होणार आहे? नाव बदलून उगीच वातावरण खराब करण्याचे काहीच कारण नाही. तसे करु नये, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणाच्या विषयावरुन भारतीय जवनता पक्षाकडून सातत्याने राजकारण सुर आहे. शिवसेनेकडून यासंदर्भात काल एक ट्वीट करण्यात आले होते. त्याबाबत कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एक किमान समान कार्यक्रम आहे. त्यानुसार सरकार काम करीत आहे. यामध्ये नामकरणाचा विषय नाही. आज अचानक विरोधी पक्षाला तो एव्हढा महत्वाचा का वाटतो, असा प्रश्न त्यांनी केला.
श्री. थोरात म्हणाले, एखाद्या शहराचे नाम बदलल्याने तेथील गरीबांना काय फायदा होणार आहे. तेथील लोकांच्या जीवनमानात काही सुधारणा होणार आहे का?. त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? देशात अनेक टिकाणी शहरांची नावे बदलण्यात आली. त्याने तेथील रहिवासीयांचा काय फायदा झाला. असे काही झाल्याचे दिसत नाही. कॅांग्रेस पक्षाचे देखील हेच धोरण आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचे नामकरण करण्याचा विषय अद्याप सरकारपुढे आलेला नाही. औरंगाबाद विमानतळाचे नामकरण करण्याचा विषय यापुर्वीच राज्य सरकारपुढे आलेला होता. त्यामुळे विमानतळाचे नामकरण होऊ शकते.
संजय राऊत यांनी या विषयावर सामनातून मांडलेल्या भूमिकेबद्दल श्री. थोरात म्हणाले, खासदार राऊत सामनाचे संपादक आहेत. संपादकांना विविध भूमिका मांडाव्या लागतात. काही विषयांवर भूमिका घ्यावी लागते. त्यानुसार ते करतात. त्यांनी यापुर्वी राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीने अतिशय चांगली भूमिका घेऊन काम केले आहे. तिन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठीचा त्यांचा आग्रह व पाठपुरावा चांगला होता.
...

