मनमोहनसिंगच चीनपुढे झुकले होते : भाजप अध्यक्षांचा आरोप  - BJP President J P Nadda Criticizes Dr. Manmohan Singh | Politics Marathi News - Sarkarnama

मनमोहनसिंगच चीनपुढे झुकले होते : भाजप अध्यक्षांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 जून 2020

माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांनी २०१० ते २०१३ या काळात चीनकडून झालेल्या सुमारे ६०० घुसखोरीच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केले होते, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. याच काळात तेव्हाच्या सरकारने काहीशे किलोमीटरचा भूभाग चीनला देऊन टाकला असाही त्यांचा आरोप आहे.

पुणे : माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांनी २०१० ते २०१३ या काळात चीनकडून झालेल्या सुमारे ६०० घुसखोरीच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केले होते, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. याच काळात तेव्हाच्या सरकारने काहीशे किलोमीटरचा भूभाग चीनला देऊन टाकला असाही त्यांचा आरोप आहे.

भारत व चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देणारे एक निवेदन डाॅ. मनमोहनसिंग यांनी प्रसिद्ध केले होते. त्याचा समाचार नड्डा यांनी घेतला आहे. 'मनमोहनसिंग हे त्याच पक्षाचे आहे ज्या पक्षाच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आपल्या कार्यकाळात चीनला ४३ हजार किलोमीटरचा भूभाग कुठलाही संघर्ष न करता देऊन टाकला, अशी टीका नड्डा यांनी केली आहे. 

मनमोहनसिंग यांचे वक्तव्य हा निव्वळ शब्दांचा खेळ असून काँग्रेसच्या नेत्यांची एकूण वर्तणूक पाहता देशातील जनता त्यांच्या विधानांवर विश्वास ठेवणार नाही, असाही दावा नड्डा यांनी केला आहे. अशा कठीण वेळी सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा मुकाबला करायला हवा, असे मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटले होते. त्याचीही खिल्ली नड्डा यांनी उडवली आहे. एकत्र येण्याची भाषा केवळ कागदावरची आहे, प्रत्यक्षात एकात्मतेच्या वातावरणाला खीळ घालण्याचे काम कोण करत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही नड्डा म्हणालेत. डा्ॅ. सिंग यांनी किमान आपल्या पक्षातल्या नेत्यांची वर्तणूक सुधारावी, असाही सल्ला त्यांनी दिलाय.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख