`अमित शहा हे फुगवलेले निवडणूक रणनीतीकार आणि नेते.... मी त्यांना तीन वेळा हरवलयं!` - Amit shah is overrated political leader and election manager criticizes Prashant Kishor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

`अमित शहा हे फुगवलेले निवडणूक रणनीतीकार आणि नेते.... मी त्यांना तीन वेळा हरवलयं!`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

राजकीय नेता म्हणूनही अमित शहांबद्दल मला आदर नाही.... 

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काॅंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय आणि तितकाच भाजपचा दारूण पराभव या दोन्ही बाबींमुळे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत आले आहेत. भाजपला या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, या त्यांच्या विधानावर  सुरवातीला कोणाचाच विश्वास बसला नव्हता. पण तसे घडल्याने `पीके` ब्रॅंड नव्या उंचीवर पोहोचला.  निवडणूक निकालानंतर  कोलकत्याच्या `द टेलिग्राफ`ने त्यांची मुलाखत प्रसिद्ध केली असून त्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे `ओव्हररेटेड` राजकीय नेते आहेत, असा दावा केला आहे. तसेच राहुल गांधी आणि काॅंग्रेसचा का राग येतो, याचीही कारणे दिली आहेत. (Amit shah is overrated political leader and election manager criticizes Prashant Kishor)

त्यांच्या मुलाखतीचा हा महत्वाचा भाग  

प्रश्न -तुम्ही निवडणूकीचा निकाल काय लागेल, हे आधीच वर्तवले होते. तेव्हा कोणाचा विश्वास बसला नव्हता. तुम्हाला एवढा विश्वास का होता?

पीके- माझ्या भाकितावर लोक विश्वास का ठेवत नव्हते, हे मला माहीत नाही. पण आम्ही चांगल्या फरकाने जिंकू, याची मला खात्री होती. निव्वळ प्रोपागंडा (भ्रम) हा निवडणुकीत विजय मिळवू देऊ शकत नाही. निवडणुकीच्या आधीच भाजपने स्वतःला विजयी म्हणून घोषित केले होते. ते हवेत उंच उडत होते. त्यातून त्यांना प्रत्यक्षात जमिनीवर काय स्थिती होती, याचा अंदाजच आला नाही. भाजपला त्यातही विशेषतः अमित शहांसारख्या नेत्यांना अहंकाराची बाधा झाली होती. त्याचा हा परिणाम आहे. भाजपला गंभीरपणे तोडीस तोड उत्तर देणारा जर कोणी भेटला तर निकाल काय लागू शकतो, हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आले. ममता बॅनर्जी त्यास तयार होत्या. या, आम्ही सिद्ध आहोत. आम्ही लढू. खेला होबे, असे त्यांनी सांगितलेच होते. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममतांना धक्का बसला होता. पण त्यांनी हा धोका गंभीरपणे घेतला. तेव्हाचं मला आठवतय. माझे वडिल नुकतेच निर्वतले होते आणि त्याच वेळी त्यांनी मला गळ घातली होती. कुटुंब दुःखात असल्याचं मी त्यांंना म्हटलं होतं. पण त्या अस्वस्थ आणि काळजीत होत्या. तुम्ही लवकर या, लवकर या, अशी घाई करत होत्या. तातडीने सुधारणा करण्याची गरज त्यांना वाटत होती. एक खरा नेता ज्या पद्धतीने संकटाला, लढाईला सामोरे जाण्याची तयारी करतो तसे त्यांचे झाले होते. एक मुरब्बी लढवय्या नेता आणि राहुल गांधी यांच्यातील फरक त्या मला दाखवून देत होत्या. त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. लढाईत पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी त्या सिद्ध झाल्या.  2019 च्या लोकसभेतील विजयानंतर भाजपच्या हे लक्षातच आले नाही. जनतेपर्य़ंत पोहोचण्यासाठी ममतांनी सतत योजना आणि प्रचार अधिक जोमाने सुरू ठेवला होता. जनतेपर्यंत त्या नव्या चेहऱ्याने सामोरे जात होत्या. त्याचा प्रभाव पडत होता. त्याकडे भाजपने दुर्लक्ष केले.

प्रश्न : भाजप हा पश्चिम बंगालमधील एक प्रमुख पक्ष झाल्याचे तुम्ही सांगत होता. मग त्यांना इतक्या कमी जागा का मिळाल्या? 

पीके : माझे म्हणणं तुम्हाला उद्धटपणाच कदाचित वाटू शकतं. पण माझ्या मते अमित शहा हे `ओव्हररेटेट` (फुगवलेले) राजकीय नेते आणि निवडणूक व्यवस्थापक आहेत. त्यांच्या ग्रेट म्हणवल्या जाणाऱ्या आणि दंतकथा बनलेल्या निवडणूक व्यवस्थापनातून आपल्याला काय दिसतं? अमित शहा हे करिश्मा असलेले नेते आहेत. प्रचंड अशी साधनसंपत्ती त्यांच्या पायाशी आहे. रा. स्व. संघाचे मोठे संघटन त्यांच्याजवळ आहे. विविध सरकारी यंत्रणा त्यांच्या हाताशी आहेत. पायाशी लोळण घेणारा निवडणूक आयोग आहे. अशा साऱ्या बाबी असतानाही ते हरले. अमित शहांशी माझा थेट सामना तीन वेळा झाला आणि तीनही वेळा मी त्यांना हरवलं आहे. 2015 ला बिहारच्या निवडणुकीत, दिल्ली आणि आता बंगालमध्ये. तीनही ठिकाणी त्यांचा प्रभाव दिसला नाही. भाजपशी युती केलेल्या पक्षांना आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये आम्ही हरवलं. राजकीय व्यवस्थापक म्हणून मी त्यांना शून्य किंमत देईल. राजकीय नेता म्हणूनही मला  त्यांच्याबद्दल आदर नाही. 

प्रश्न : निवडणूक आयोग पक्षपाती असल्याची टीका तुम्ही केली होती....

पीके : ही फक्त बंगालचीच नाही तर देशाचीच स्थिती आहे आणि लोकशाहीच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. हा आयोग गुंडाळून ठेवल्याचे पाहून लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाला चिंता करणे गरजेचे आहे. पश्चिम बंगालमध्ये तर आयोगाची भूमिका इतकी संशयास्पद होती की ते दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचे हुजरे वाटत होते. निवडणूक यंत्रणेची साथ नसती तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 50 जागाही मिळू शकल्या नसल्या. त्याची काही उदाहरणे माझ्याकडे आहेत. भाजपने बंगालमध्ये धार्मिक प्रचार केला. `जय श्रीराम` घोषणेच्या नावाखाली उघडपणे हिंदुत्व प्रचारात वापरले. निवडणूक आयोगाने काय केले? काहीही नाही. आणि हा मोठा धोका आहे. तो निवडणुकीपुरता मर्यादित नाही. लोकांनी आता याविषयी जागृत झालं पाहिजे. 

प्रश्न : तुमच्यासमोरील सर्वात कठिण आव्हान कोणते होते?

पीके : आव्हान कठिण होते की नाही, हे सांगणे कठिण आहे. पण ते सोपे नव्हते, हे खरे. विजयाच्या आकड्यांमुळे त्याची कल्पना येणार नाही. पण ही लढाई तीव्र होती आणि ती सर्व पातळ्यांवर लढावी लागली. माझी मलाच शंका यावी, असे काही प्रसंग आले. भाजपच्या विजयाचे दावे करणारे स्वर जेव्हा मिडियामधून तीव्र होऊ लागले आणि चॅनेलवाले भाजप तर सहजच जिंकू शकेल याची खात्री देऊ लागले तेव्हा मी पण बुचकळ्यात पडलो होतो. पण नंतर मीच मला सावरले. मी बंगालमध्ये गेली 15 महिने काय करत होतो, याचे उत्तर शोधू लागलो. निवडणूक वार्तांकनासाठी येथे आठवडाभरासाठी येणाऱ्या मंडळींचे खरे मानावे की माझ्या कामावर, अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवावा? ममता बॅनर्जी सरकारविरोधात प्रचंड असंतोष असल्याने टीएमसीमध्ये उभी फूट पडून नेतेमंडळी पक्ष सोडून जात आहेत, हे `नॅरेटिव्ह` भाजपने ठरवले होते आणि मिडिया पण तीच री ओढत होता.

प्रत्यक्षात काय घडले? ही नेतेमंडळी पक्षातून बाहेर पडल्याने नवीन तृणमूल काॅंग्रेस जन्माला आला आणि हे कोणाच्या लक्षात आले नाही. मिडिया हवा तयार करू शकते. या गोंगाटाच्या हवेचा मताधिक्यावर परिणाम होऊ शकतो पण मिडियाा तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही किंवा हरवू शकत नाही. मिडिया हे एखाद्या अॅम्लिफायरसारखा असतो पण तो मूळ आवाज नाही. मूळ आवाज हा लोकांमधून येत असतो. जनता आपल्याला सांगत असते. तेच खरे.

प्रश्न ः बंगालच्या निवडणुकीनंतर पुढे काय?

पीकेः ते आताच सांगणे कठिण आहे.

प्रश्न : भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत राहणार की एकपक्षीय, याचा निर्णय बंगालच्या निवडणुकीत होणार असल्याचे तुम्ही बोलला होता..

पीके : भाजपच्या धोक्याशी लढणाऱ्यांना बळ आणि आशा या निकालाने दिली आहे. ज्यांना भाजपच्या विरोधात खरेच गंभीरपणे लढायचे आहे त्यांना यातून मार्ग दिसला आहे. भाजपला हरविण्यासाठीचे काही धडे येथून मिळतील. त्यांना हरवणे शक्य आहे. तशी इच्छा, रणनीती असायला हवी. ते धाडस करायला हवे. म्हणूनच मला राहुल गांधी आणि काॅंग्रेसबद्दल राग येतो. ते अनेक कारणे सांगतात. तुम्हाला काम करू देत नाहीत. तुम्ही जे सांगताय ते ऐकत नाहीत. आमच्याकडे साधनसंपत्ती नाही, मिडियाचा पाठिंबा नाही, ध्रुवीकरण खूप झाले आहे, अशा सबबी काॅंग्रेसवाले सांगतात. ध्रुवीकरण हा बागुलबुवा आहे. हिंदूंचे कधीच ध्रुवीकरण होत नाही. भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्ये तसे ना झाले ना उत्तर प्रदेशमध्ये! या सबबीखाली भाजपशी लढाई टाळणाऱ्यांसोबत तुम्ही कसे काम करणार? या लढाईसाठी स्वतःला गाडून घेणारे आणि गंभीरपणे लढणारे नेते हवे आहेत. ममता बॅनर्जी अशा लढाईसाठी तयार होत्या. 2019 च्या धक्क्यानंतर त्यांनी सुरवातीपासून तयारी केली आणि त्याचा काय निकाल लागला हे तुम्ही पाहता आहातच.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख