काहींची दृष्टीच वक्र असते : अमित शहांचा राहुल गांधींना टोमणा - Amit Shah Criticized Rahul Gandhi over his hashtag on Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

काहींची दृष्टीच वक्र असते : अमित शहांचा राहुल गांधींना टोमणा

वृत्तसंस्था
रविवार, 28 जून 2020

'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी #SurrendeerModi असा हॅशटॅग वापरुन मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला अमित शहा यांनी उत्तर दिले.

नवी दिल्ली : भारत सरकार आपल्या देशाच्या विरोधात होणाऱ्या प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी समर्थ आहे. मात्र एका मोठ्या राजकीय पक्षाचे माजी अध्यक्ष संकटाच्या काळात घाणेरडे राजकारण करतात हे दुर्दैवी आहे. त्यांनी पंतप्रधानांबाबत जो हॅशटॅग वापरला, तो चीन व पाकिस्तान यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आहे, याबद्दल राहुल गांधी व त्यांच्या पक्षाने आत्मपरिक्षण करावे, असा टोमणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मारला आहे. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा बोलत होते. राहुल गांधी यांनी #SurrendeerModi असा हॅशटॅग वापरुन मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला अमित शहा यांनी उत्तर दिले.  भारत सरकारने कोरोनाच्या विरोधात चांगला लढा दिला आहे. मी राहुल गांधींना सल्ला देऊ शकत नाही. ते त्यांच्या पक्षातल्या लोकांचे काम आहे. काही जणांची दृष्टी वक्र असते. त्यांना चांगल्या गोष्टीतही वाईट दिसते. भारताने कोरोनाशी उत्तम लढा दिला आहे. आणि जगातल्या इतर देशांच्या तुलनेत इथली आकडेवारीही कमी आहे, असे शहा म्हणाले. 

मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण कोरोना आणि पूर्व लडाख मधील सीमेवरील परिस्थिती या दोन्हीवर विजय मिळवू, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. काँग्रेसवर टीका करताना शहा म्हणाले, ''आणिबाणीत लोकशाहीच्या मूळावरच घाला घातला गेला. यासाठी लोकांनी आणिबाणीच्या दिवसांचे स्मरण ठेवले पाहिजे. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याने किंवा नागरिकाने ते दिवस विसरता कामा नयेत. हा कुठल्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही तर देशातल्या लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रश्न आहे.,''

दिल्लीच्या कोरोना स्थिती बाबत बोलताना अमित शहा म्हणाले, ''केंद्राने प्रत्येक चर्चेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सहभागी करुन घेतले होते. या काळात काही राजकीय वक्तव्ये झाली असतीलही. पण त्याचा निर्णयांवर कुठलाही परिणाम झाला नाही. ३१ जुलैपर्यंत दिल्लीत कोरोनाचे साडेपाच लाख रुग्ण असतील असे वक्तव्य दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. पण आपण हा आकडा गाठणार नाही, याची मला खात्री आहे. कारण आम्ही प्रतिबंधात्मक उपायययोजनांवर भर  दिला आहे,''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख