स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सत्तरव्या वर्षी करताहेत सुरक्षा रक्षकाची नोकरी  - the former chairman of the standing committee has been working as a security guard on seventy years | Politics Marathi News - Sarkarnama

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सत्तरव्या वर्षी करताहेत सुरक्षा रक्षकाची नोकरी 

राजेश प्रायकर 
शनिवार, 18 जुलै 2020

1985 मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून ते सर्वप्रथम निवडून आले. याच पंचवार्षिकमध्ये 1990-91 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. सध्या ते शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 

नागपूर : महापालिकेची तिजोरी सांभाळल्यानंतर शहर विकासासाठी कोट्यवधीची तरतूद करणारे हात आज सुरक्षा रक्षकाची नोकरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहेत. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवराव तिजारे यांना वयाच्या सत्तरव्या वर्षी कुटुंबाच्या जबाबदारीमुळे नोकरी करावी लागत आहे. 

परिस्थिती कशी कलाटणी घेईल, कुणीही सांगू शकत नाही. एकेकाळी महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेले देवराव तिजारे यांनाही परिस्थितीपुढे नमते घेत वयाच्या सत्तराव्या वर्षी नोकरी करावी लागत आहे. स्थायी समिती अध्यक्ष असल्यामुळे ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्तही होते. आज त्यांच गोकुळपेठ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. फारच साधे असलेले तिजारे यांचे आजही दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी या दिग्गज नेत्यांशी संबंध आहेत. परंतु त्यांनी संबंधाचा फायदा घेत पुढे जाण्याऐवजी स्वतःच्या हिमतीवर विश्‍वास दाखवला. या नेत्यांकडे परिस्थितीबाबत वाच्यताही केली नाही. 

आपण भले आणि आपले काम भले, या साध्या विचारणीने त्यांना वयाच्या सत्तराव्या वर्षीही उर्जा मिळत असल्याचे दिसून येत आहे. आयुष्यात पैसा कमावला नाही, याची थोडीही खंत त्यांना नाही. मात्र, लोकांमध्ये राहण्याची सवय असल्याने ते रात्रभर ड्युटी केल्यानंतरही दिवसा गरजवंतांच्या मदतीसाठी कधी महापालिका तर कधी नासुप्रमध्ये जातात. गरजवंतांची कामे केल्यानेही उर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमुद केले. त्यांना बघितल्यानंतर प्रामाणिकपणचा चेहरा देवराव तिजारे यांच्यापेक्षा वेगळा नसेल, असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. 

नोकरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह 
देवराव तिजारे पत्नी, दोन मुली व एका मुलासह राहतात. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान प्राची पॉलिटेक्‍निक करीत आहे. तर मुलगा ज्ञानेश बी कॉमचे शिक्षण घेत आहे. एका मुलीची जबाबदारी पार पाडली असली तर महागाईच्या काळात दोघांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे. 

दोन वेळा रहीले नगरसेवक 
1985 मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून ते सर्वप्रथम निवडून आले. याच पंचवार्षिकमध्ये 1990-91 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. सध्या ते शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 

घर चालविण्यासाठी नोकरी करावी लागत आहे. परंतु याबाबत कुठलीही खंत नाही किंवा नाराजी नाही. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची अजूनही ताकद आहे. पैसा नाही, परंतु आरोग्य सांभाळले. त्यामुळेच रात्रीला ड्युटी केल्यानंतरही कुणी मदतीसाठी हाक दिली तर जात असतो. 
- देवराव तिजारे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.   (Edited By : Atul Mehere)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख