भाजप सरकारी पक्ष...शिवसेनेत मात्र होते थेट अॅक्शन!
Sunil Bagul

भाजप सरकारी पक्ष...शिवसेनेत मात्र होते थेट अॅक्शन!

अनेकवर्षे शिवसेनेत काम केले आहे. त्यामुळे पुन्हा मुळ घरी परतलो. त्याचा खुप आनंद वाटतो, असे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे नेते सुनिल बागूल म्हणाले.

नाशिक : भारतीय जनता पक्षात काम करताना तो पक्ष सरकारी कामकाज करताना येतो तसा अनुभव आला. शिवसेनेत मात्र थेट अॅक्शन होतो. अनेक वर्षे शिवसेनेत काम केले आहे. त्यामुळे पुन्हा मुळ घरी परतलो. त्याचा खुप आनंद वाटतो, असे नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले भाजपचे नेते सुनिल बागूल म्हणाले. 

माजी आमदार गिते व श्री. बागूल दोघांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केल्यावर सोमवारी नाशिकला शिवसेना भवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. श्री. गिते १३ वर्षांनी, तर बागूल आठ वर्षांनी शिवसेना भवनमध्ये परतले. 

यावेळी श्री. बागूल म्हणाले, की काही दिवसांसाठीच शिवसेना तुमच्याकडे सांभाळण्यासाठी दिला होता. भाजपमध्ये काम करताना सरकारी कामकाजासारखा अनुभव आला. परंतु शिवसेनेत थेट ‘अ‍ॅक्शन’ चालत असल्याने त्याची सवयच होती. माजी महापौर विनायक पांडे यांचे प्रयत्न व नगरसेवकांनी साकडे घातल्याने पुन्हा दैवताकडे म्हणजे सेनेत परतण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या कामकाजाची पद्धत लक्षात घेता शिवसेनेवर भगवा फडकवू. शिवसेना सोडायची नव्हती. मात्र काही गोष्टी हाती नव्हत्या. शिवसेनेच्या भगव्यातच मरायचे होते. आता ते साध्य करता येईल. एकत्र राहणाऱ्या चारपैकी एक भाऊ नाराज झाला तर उर्वरित तिघे भाऊ नवीन घर घेऊन देता, मात्र मला एकटे सोडल्याची भावना बागूल यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर बसलेले ‘हुशार’ लोक मला जोपर्यंत परत बोलवत नाहीत तोपर्यंत मी पक्षात येऊ शकत नव्हतो.

यावेळी बागूल यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमच्याकडून ९९.९९ टक्के अडचण होणार नाही; मात्र व्यासपीठाकडे बघत आम्हालाही त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन केले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांवर भगवा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला. श्री. घोलप म्हणाले, की शिवसेनेला आता सुगीचे दिवस आलेत. पक्षात जुना-नवा वाद निर्माण न करता शिवसेना नव्या जोमाने उभी करण्याचे आवाहन केले. 

या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या प्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सचिन मराठे, भाऊलाल तांबडे, योगेश बेलदार आदी उपस्थित होते. 
...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in