दागीने गहान ठेवणा-या मोहिनी जाधव यांचे सरपंच पद रद्द ! - Eklahre Sarpanch Mohini Jadhav post cancelled. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

दागीने गहान ठेवणा-या मोहिनी जाधव यांचे सरपंच पद रद्द !

निलेश छाजेड
गुरुवार, 21 जानेवारी 2021

ग्रामपंचायत कर्मच-यांच्या पगारासाठी स्वतःचे दागीने गहान ठेवणा-या सरपंच म्हणून चर्चेत आलेल्या एकलहरे येथील माहिनी जाधव यांचे सरपंचपद शासनाने रद्द केले. त्यांच्या सास-यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच पद गमवावे लागले.

 

एकलहरे : ग्रामपंचायत कर्मच-यांच्या पगारासाठी स्वतःचे दागीने गहान ठेवणा-या सरपंच म्हणून चर्चेत आलेल्या एकलहरे येथील माहिनी जाधव यांचे सरपंचपद शासनाने रद्द केले. त्यांच्या सास-यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच पद गमवावे लागल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. 

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे झालेल्या तक्रारीच्या सुनावणीत हा निर्णय झाला. श्रीमती जाधव यांच्या कुटुंबाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांना अपात्र ठरवावे यासाठी मोहन विठ्ठल लिंबोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. श्रीमती जाधव एकलहरे ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या असून, २०१७ पासून २०२२ पर्यंत सरपंचपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या सासऱ्यांनी एकलहरे परिसरातील गोदावरी कालव्यावर अतिक्रमण करून वसविलेल्या सिद्धार्थनगर या येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे.  त्यांच्या पतीचा याच जागेवर व्यवसाय आहे. त्यामुळे जाधव कुटुंबाचे शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी श्री. लिंबोळे यांची तक्रार होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेला निकाल धक्कादायक आहे. गावातील भ्रष्ट रेशन दुकानावर कठोर कारवाईसाठी सतत पाठपुरावा केल्याने माझ्याविरुद्ध राजकीय षडयंत्र रचून खोटी तक्रार दाखल केली गेली. पाटबंधारे विभागाने अतिक्रमण नसल्याबाबतचा स्पष्ट अहवाल देऊनसुद्धा निकाल माझ्याविरोधात देऊन माझ्यावर अन्याय केला आहे. झालेल्या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार आहे.
-मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख