नाशिक : माजी आमदार वसंत गिते आणि सुनिल बागूल यांना विचारुनच आम्ही तिकीट वाटपापासून तर संघटनात्मक कामकाज करीत होतो. ते आमच्या कोअर कमिटीचे सदस्य होते. दोघांच्याही घरात उपमहापौर पद दिले तरीही ते शिवसेनेत का गेले हे समजत नाही? असे भाजपच्या नेत्यांनी केलेल्या शिवसेना प्रवेशाने गोंधळलेले भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी म्हटले आहे.
भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याने राज्यभर भाजपला धक्का बसला. त्यातून नाशिक शहरातील भाजप सावरलेली नाही. भविष्यात कशी वाटचाल करावी असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी व्यक्त केलेल्या भावना त्याची जाणीव करुन देतात.
यासंदर्भात श्री. पालवे यांनी सायंकाळी उशीरा एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात ते म्हणतात, भाजपमध्ये सन्मानजनक स्थान असतानाही त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे खेदजनक आहे. संघटनात्मक दृष्टीने भाजप हा कार्यकर्त्यांचा, लोकशाही तत्वांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांनी कुठल्या पक्षात जाऊ शकते. मात्र त्याचा भाजपवर संघटनात्मक दृष्ट्या काहीही परिणाम होणार नाही. भाजपची शक्ती कमी झालेली नाही.
या दोन्ही नेत्यांचा भाजपने सन्मानच केला होता. दोघांनाही प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. कोअर कमिटी सदस्य म्हणून विविध निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. श्री. गिते यांचा मुलगा प्रथमेशला आणि बागुल यांच्या मोतोश्री भिकुबाई बागुल यांनाउपमहापौर पद दिले. त्यांचा मुलगा मानिषला युवा मोर्चाचे अध्यक्षपद दिले. प्रथमेश गीते याना गेल्या टर्ममध्ये युवा मोर्चा उपाध्यक्ष पद दिले होते. महापालिका निवडणूक प्रक्रियेत अंतर्गत समित्यांची निवड, उमेदवारांचे तिकिट वाटप यामध्ये हे दोन्ही नेते होते.
पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेतही महत्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. हे सर्व दिलेले असतानाही अधिक काही अपेक्षा व्यक्त केल्या असत्या तर प्रदेश नेतृत्वाने नक्कीच त्यांचे म्हणणे ऐकून न्याय देण्याचा प्रयत्न केला असता. मात्र त्यांनी मनातल्या गोष्टी प्रदेश नेतृत्वाकडे सांगतिल्याच नाही ही खेदाची बाब आहे असे मतश्री. पालवे यांनी व्यक्त केले.
....

