मुंबई : शिवसेना आमदार राजन साळवी यांनी आज नाणार आणि जैतापूर प्रकल्पांबाबत विधाने करत शिवसेनेच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण केला. त्यांच्या वक्तव्यामुळे `मातोश्री`वर मात्र भडका उडाला. त्यामुळे साळवी यांची ही भूमिका शिवसेनेची भूमिका नसल्याचे तत्परतेने स्पष्ट करण्यात आले.
जैतापूर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांपैकी तब्बल 90 टक्के जणांनी मोबदला स्वीकारला असल्यामुळे या ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले. तसेच नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली.
विरोधकांनी तर आयती टीका करण्याची संधी मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबदला कोणाला मिळाला, याची चौकशी करावी लागेल, अशी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांच्या नावाखाली प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका शिवसेना आता सोडून देईल, अशीही अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
साळवी यांच्या विधानावर मात्र तातडीने शिवसेनेने प्रतिक्रिया दिली. साळवी यांची ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. साळवी यांच्या विधानास पक्षाची मान्यता नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कळवले आहे
जैतापूरमध्ये नक्की काय झाले?
स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी, मच्छीमार बांधवांनी दिलेल्या दशकभराच्या लढ्यामुळे देश-विदेशामध्ये चर्चेत आलेल्या तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील सुमारे 95 टक्के लाभार्थ्यांनी शासनाकडून देय असलेले मूळ आणि सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे.
त्यामध्ये प्रकल्पग्रस्त पाच गावांमधील 1 हजार 845 खातेदारांना मूळ अनुदानापोटी 13 कोटी 65 लाख तर सानुग्रह अनुदानापोटी 195 कोटी रुपयांचे प्रशासनाकडून वाटप करण्यात आले आहे.
तालुक्यातील माडबन येथे जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्हणून याला ओळखले जाणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी, मच्छीमार बांधव यांनी विविध प्रकारे आंदोलने छेडून तीव्र विरोध केला. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांसह शेतकरी, मच्छीमार बांधवांनी अनेकवेळा जेलभरो आंदोलन छेडले. या आंदोलनाला शिवसेनेचे पाठबळ लाभून त्याची व्याप्ती अधिक झाली होती.
आंदोलनाला काहीवेळा हिंसक वळणही लागले होते. त्यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका युवकाचा मृत्यूही झाला होता. आंदोलनकर्त्यांचा आंदोलनाच्या माध्यमातून सुमारे दशकभर लढा सुरू होता; मात्र गेल्या काही वर्षापासून प्रकल्पविरोधी आंदोलने झालेली नाही. त्यातच, लोकांनी जमिनीच्या मोबदल्याच्या दिली जाणारी रक्कमही स्वीकारली आहे. त्यामुळे त्यातून, प्रकल्प विरोध मावळल्याचे चित्र सद्यःस्थितीमध्ये दिसत आहे.
दृष्टिक्षेपात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
प्रकल्पग्रस्त गावे ः माडबन, मिठगवाणे, करेल, निवेली, वरचावाडा
एकूण प्रकल्पग्रस्त ः 2 हजार 336
अनुदान स्वीकारलेले प्रकल्पग्रस्त ः 1 हजार 845
मूळ अनुदान रक्कम वाटप ः 13 कोटी 65 लाख
सानुग्रह अनुदान रक्कम वाटप ः 195 कोटी
प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सद्यःस्थितीमध्ये काम ठप्प झालेले आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर सोलर एनर्जी प्रकल्प राबवावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली असून त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्याला शासनाकडून मान्यता मिळाल्यास अणुऊर्जा प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्यता आहे.

