मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये नस्ती (फाईल) घोटाळा होत असल्याचा आरोप विधानसभेत करत खळबळ उडवून दिली. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आदेश डावलला जात असल्याचे एक प्रकरण त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या वर कशी काय स्वाक्षरी केली जाते, असा सवाल त्यांनी केला.
विशेष म्हणजे शेलार यांनी केलेला हा आरोप योग्य असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चव्हाण यांनी उत्तरात सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात चौकशीची मान्यता चव्हाण यांनी फाईलवर दिली. त्याला ठाकरे यांनीही फेरमान्यता दिली. प्रत्यक्षात आदेश निघताना चौकशी थांबविण्याचा निर्णय बाहेर आला. हे कसे काय झाले याचे आश्चर्य शेलार यांनी व्यक्त केले. एका विशिष्ट अधिकाऱ्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय सेवा प्राधिकरणाने (कॅट) एका अधिकाऱ्याविरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिलेला असतानाही त्याला अर्थ खात्यासोबत बांधकाम विभागाचाही अतिरिक्त कारभार कसाकाय देण्यात आला, असा सवाल शेलार यांनी विचारला.
चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश बदलणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या जे काय निघेल त्यानुसार कारवाई होईल, असे सभागृहात सांगितले. त्याला भाजपचे आमदार सुधीर मुनगंटिवार यांनी आक्षेप घेत जे काय निघेल त्यानुसार नव्हे तर सभागृह ठरवेल त्यानुसार कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी माझीही तशीच भावना असल्याचे सांगत नियमानुसार कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

