one crore shivbhojan thalis served udhhav thackrey says | Sarkarnama

शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा  दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई :  गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात  “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झाले आहे. 

योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा  दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.  जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर  लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.  या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाच्या
सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतूक केले आहे.  शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई  : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्यां रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.  यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा  ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख