प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत.
Maharashtra chief minister udhhav thackrey on plasma therapy
Maharashtra chief minister udhhav thackrey on plasma therapy

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. या प्लाझ्मा थेरपी सेंटरसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 16 कोटी 85 लाख रुपये देण्यात आले आहेत.व्हीडीओ
कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवल आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध
आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com