congress may oppose extension to Ajoy Mehta as chief secretary fourth time | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील या अधिकाऱ्याच्या मुदतवाढीला काॅंग्रेसचा विरोध

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 जून 2020

प्रशासकीय वर्तुळात आपली दखल घेतली जात नसल्याची काॅंग्रेसच्या नेत्यांची तक्रार आहे. 

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याबाबत आता सत्ताधारी पक्षातील काॅंग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. मेहता यांनी मुदतवाढ देऊ नये म्हणून काय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आता राज्यपालांकडे धाव घेतली आहे. मेहता यांची मुदत जून अखेरीस संपत असून त्यांना चौथ्यांदा मुदतावाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांच्या मनात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देण्यासाठी कोरोनाचे कारण देण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या लढाईत गुंतलेली असल्याने त्यात सूसूत्रता आणि समन्वय ठेवण्यासाठी मेहता हेच योग्य असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र मेहता यांना मुदतवाढ दिल्यास संजय कुमार, सीताराम कुंटे, प्रवीण परदेशी या अधिकाऱ्यांना मुख्य सचिवपदाची संधी अवघड होत आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळातूनही या प्रस्तावाबाबत नाराजीच दिसून येत आहे.

काॅंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना मेहता हे शरद पवार व अजित पवार यांच्या जवळचे मानण्यात येत होते. भाजपचे सरकार आल्यानंतर ते फडणवीस यांच्याही जवळ गेले. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही त्यांच्याही मर्जीत आहेत. काॅंग्रेस मात्र मेहतांबद्दल फार खूष नसल्याची चर्चा आहे. त्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी मेहतांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. 

दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडेही याबाबत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तक्रारी केल्यामुळे यावेळी मेहता यांना कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय सरकार घेणार असेल, तर त्याविरोधात थेट भूमिका घ्यावी, असे दिल्लीहून सांगितल्याची चर्चा आहे. याबाबत काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा हवाला काही माध्यमांनी दिली आहे. 

सध्या १० ते ११ अधिकाऱ्यांना कोणतेही पोस्टिंग न देता असेच बसवून ठेवण्यात आले आहे. सनदी अधिकाऱ्यांमधील हा असंतोष पंजाबी विरुद्ध मराठी आणि इतर अशा पातळीवरही जाऊन पोहोचला असल्याचे अनेक अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे म्हणणे आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख