राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव वरच्या क्रमांकावर

राज्यपाल नियुक्त जागांमध्ये राष्ट्रवादी राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक असा तिहेरी समतोल साधण्याचे गणित मांडले जात आहे. राजू शेट्टींनी राष्ट्रवादीकडूनच मात्र स्वाभीमानीतून उमेदवारी स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर आता भाजपचे जेष्ठ नाराज नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी एंट्रीच्या प्रक्रीयेलाही वेग आला आहे. त्यांचेही नाव संभाव्य यादीत वरच्या क्रमांकावर आहे.
eknath khadase
eknath khadase

बीड : राज्यपाल नियुक्त जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याच्या दृष्टीने नावांवर खल सुरु आहे. यात राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच कोट्यातून मात्र त्यांच्या स्वाभीमानीच्या नावाने उमेदवारी स्विकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता या यादीत भाजपचे नाराज जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नावही वरच्या नंबरवर आहे.

सामाजिक समतोलाच्या निमित्ताने धनगर समाजातून एकाला प्रतिनिधित्व देण्याबाबत खल सुरु असून यात बारामतीचे श्री. देवकते कि बीडच्या आष्टीचे शिवाजी राऊत या दोन नावांवर चर्चा आहे. मोहोळ (जि. सोलापूर) येथील राजन पाटील यांचा दावा त्यांचे भाचे अमरसिंह पंडित यांच्यापेक्षा प्रबळ मानला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीची यादी अंतिम होताना वरीलपैकीच बहुतेक नावे असतील अशी माहिती राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधानसभेलाही भाजपकडून उमेदवारी टाळण्यात आली. त्यात त्यांच्या कन्येचाही पराभव झाला. त्यांनी पक्षासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अनेक वेळा जाहीर नाराजी आणि टीकाही केलेली आहे. मागच्या महिन्यात विधान परिषदेच्या निवडुण द्यायच्या जागेत त्यांची उमेदवारी कट झाल्यानंतर तर त्यांनी अगदीच हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील योगदान आणि सिनीआॅरीटीवरुन राळ उठविली. त्यांची विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा जोराने होते. परंतु, त्यांना भाजपकडून विधान परिषदेची असलेली शेवटची आशाही मावळली आहे. त्यामुळे त्याला आता या राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेच्या निमित्ताने वाट मोकळी होणार आहे.

कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊनमुळे राजकीय घडोमोडी, भेटीगाठींना मर्यादा असली तरी अंतर्गत घडमोडी मात्र सुरुच आहेत. मागच्या आठवड्यात आठवड्यात स्वाभीमानी शेतकरी आघाडीचे राजू शेट्टी यांचे नाव अंतिम झाले आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेनेला पाच, काँग्रेसला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. एकिकडे पक्षपातळीवर नावे निश्चित केली जात असली तरी दुसरीकडे क्रीडा, कला, सांस्कृतिक, साहित्यीक अशा व्यक्तींसाठी असलेल्या जागांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय नावे स्वीकारतील का, अशी भीतीही पक्षांना आहे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवेळी कायद्यावर बोट ठेवणाऱ्या कोश्यारींच्या पुर्वानुभवामुळे पक्षपातळीवरही ताक फुंकून पिले जात आहे. मधल्या काळात राज्यपालांची जेष्ठ नेते शरद पवारांसह इतर नेत्यांनी घेतलेल्या भेटी याच कारणाने होत्या, अशीही माहिती आहे.

दरम्यान, या चार जागांमध्ये सर्वच बाजूंनी समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर खल सुरु आहे. राजू शेट्टींबरोबरच भाजपला धक्का देण्यासाठी आणि खानदेशात आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने भाजपचे जेष्ठ नाराज नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे आले आहे. चौघांच्या यादीत खडसेंचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपने बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही धनगर समाजाला स्थान देण्याचा विचार पुढे आला आहे. यात बारामतीचेच देवकते यांचे नाव पुढे आले आहे. पण, बारामतीऐवजी याच समाजाचा बाहेरचा चेहरा पुढे करावा, असा विचारही राष्ट्रवादीत समोर आला असून आष्टीचे शिवाजी राऊत यांच्या नावाबातही खल सुरु झाला आहे. श्री. राऊत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. चौथ्या जागेसाठी मोहळ (जि. सोलापूर) येथील राजन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील दांडगी राजकीय आसामी आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मतदार संघ राखीव असल्याने त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून संधी देण्याचा विचार पक्षात आहे. राजन पाटील यांच्यासोबतच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, आता दोघांपैकी कोणाच्या नावाला पसंती मिळते हे पहावे लागणार आहे. त्यात खडसेंच्या नावात काही बदल झाला तर आणखी यादी बदलू शकते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com