भुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रतिक्षा!

अजितदादा यांचे चिमटे...
ajit-jayant-bhujbal.jpg
ajit-jayant-bhujbal.jpg

मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांमधील थट्टामस्करी आज श्रोत्यांना अनुभवास मिळाली. त्याला निमित्त ठरल ते शंकरराव चव्हाण जलपुरस्कारा प्रदान करण्याच्या समारंभाचे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. शंकरराव यांच्या कार्याबद्दल या नेत्यांनी गौरवोद्गार काढले.

अजित पवार यांनी या निमित्ताने फिरकी घ्यायची संधी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी सांगताना साधली. चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून कसा दबदबा होता, याचे स्मरण अजितदादांनी केले. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी सचिवालयाचे नामकरण मंत्रालय केले. प्रशासनावर त्यांची पकड होती. शरद पवार हे चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात होते. त्यांच्याकडून मला चव्हाण साहेबांच्या आठवणी कळायच्या. त्यांच्या काळात कॅबिनेटच्या आधी सर्व मंत्री एकत्र भोजनासाठी एखाद्या मंत्र्याकडे कुटुंबासह जमत होते. बुधवारी कॅबिनेट असेल तर मंगळवारी भोजन असायचे. त्यानिमित्ताने सर्व एकत्र येत. भोजनासाठी एकत्र आल्याने विचारांची आदानाप्रदान व्हायची आणि कामे मार्गी लागायची,``असेही त्यांनी सांगितले. 

हाच धागा पुढे पकडून अजितदादा म्हणाले ``महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा एकोपा निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा पाडला होता. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एकत्र जेवण दिले. मग मी सर्वांना एकत्र जेवण दिले. त्यानंतर जयंत पाटलांचे निमंत्रण मिळेल. भुजबळ साहेब निमंत्रण देतील असे वाटत होते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याही निमंत्रणाची आम्ही वाट पाहिली,``असे अजित पवार म्हणताच हशा पिकला. त्यावर  ``अहो करोना आहे. त्यामुळे जेवणाचे निमंत्रण लांबले,`` अशी सारवासारव थोरात यांनी केली. त्यावर मी आणि मुख्यमंत्री यांनी जेवण दिल त्यावेळी ही करोना होता बरं. काहीतरी पटेल असे बोला, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी देताना पुन्हा जोरदार हशा पिकला. त्यावर अजित पवार यांनी गमतीचा भाग आहे, जाऊ द्या असे सांगितले. मात्र अशा भोजनामुळे भेदाभेद दूर होतात. इतरांना चविष्ट बातम्या मिळत नाही. याची नोंद सेवासदन (थोरात यांचे निवासस्थान), राॅयल स्टोन (चव्हाण यांचे निवासस्थान) , रामटेक (भुजबळ यांचे निवासस्थान) यांनी घेतली तर बरे होईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

अजित पवार यांच्या या भोजनाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात घेतला. बाळासाहेब, तुम्ही जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर तेथे येऊ, असे ठाकरे म्हणताच हास्य फुलले. त्यावर स्वबळावर म्हणजे त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. आम्ही आमची काळजी घेऊन तेथे जेवणाला येऊ, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की  शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यातील सर्वात मोठे योगदान हे जायकवाडी धरण आहे. चव्हाण साहेब यांनी आठमाही कालवे संकल्पना मांडली. महाराष्ट्रामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यानी केलेले काम मोठे आहे. मराठवाड्यात आपले पाणी अडविण्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.  मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तर दुसरीकडे पाणी वाहून जाते आहे, त्यासाठी पाणी लिफ्ट करून नेण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. विदर्भाचाही विचार केला आहे. त्यात वैनगंगेचे पाणी नळगंगेपर्यंत आणायचे आहे. तत्वतः याला मान्यता दिली आहे, हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणणार आहे. कृष्णेचे पाणी ही मराठवाड्याला देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे काम आमचा विभाग करतोय, असा दाव त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com