राजकारणात जाऊ पाहणारे दिघावकर लोकसेवा आयोगात; तीनही नावांना राज्यपालांची मंजूरी

आयोगातील सदस्य नेमण्यासाठी अजितदादांनी पुढाकार घेतला होता...
Rajeev Jadhav-Dighavkar
Rajeev Jadhav-Dighavkar

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी माजी पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar), निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव (Rajiv Jadhav) आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ देवानंद शिंदे (Devanand Shinde) यांची नियुक्ती आज करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Governor Bhagasinh Koshiyari) यांनी राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे नवे सदस्य आपल्या पदाची सूत्रे लवकरच घेतील.

दिघावकर हे नाशिक परीक्षेत्राचे पोलिल महानिरीक्षक म्हणून काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यांचा निवृत्तीनंतर राजकारणात यायचा विचार होता. त्यासाठी त्यांनी मालेगाव लोकसभा मतदारसंघातून चाचपणी केली होती.  मात्र तो मार्ग सोडून पुन्हा सनदी नोकर निवडणाऱ्या आयोगावर काम करण्यास त्यांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. राजीव जाधव यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त, दुग्धविकास सचिव अशा विविध पदांवर काम केले. ते अजित पवार यांचे  यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. देवानंद शिंदे यांचे शिक्षण क्षेत्रात काम असल्याने त्यांची नियुक्ती झाली आहे.

या नावांना तातडीेने मान्यता द्यावी, यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बुधवारी रात्री कोशियारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेच कोशियारी यांनी सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानंतर आदेश निघाला. 

आयोगातील पदे भरली जात नसल्याने कामकाज वेळेवर होत नसल्याची तक्रार होती. स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर वातावरण संतप्त झाले होते. ही पदे 31 जुलैपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार जुलैच्या अखेरच्या दोन दिवसांत ही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. या नावांना तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राज्यपाल हे सरकारला अडचणीत आणण्यासाठी या नावांना मंजूर देणार नाही, अशी सत्ताधाऱ्यांना शंका होती. आता ही नावे मंजूर झाल्याने आयोगातील सहाही सदस्यांच्या जागा भरल्या गेल्या आहेत. 

राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची तारीख जाहीर केली असून येत्या चार सप्टेंबर रोजी ती होणार आहे. या आधी झालेल्या परीक्षांच्या मुलाखतीही पार पडायच्या आहेत. आयोगातील पदे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यास वेग येण्याची अपेक्षा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com