Thane Will be Completely Locked Down from 1st July | Sarkarnama

ठाणे शहर एक जुलैच्या मध्यरात्रीपासून दहा दिवस पूर्ण लॉकडाऊन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

शासनाने अनलॉक जाहीर केल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. झोपडपट्ट्यांनंतर अनेक सोसायट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

ठाणे  : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. हे लक्षात घेऊन, आता १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाॅकडाऊनची सूचना केली होती. 

कोरोना रोखायचा असेल तर  शहरातील केवळ काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाहीत.  कारण त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊ शकतात आणि त्या भागातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होऊ शकते, असे दिसल्याने लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. 

शासनाने अनलॉक जाहीर केल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. झोपडपट्ट्यांनंतर अनेक सोसायट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हे रोखण्यासाठी सुरुवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून व ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून केवळ त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस सुरू होती. त्यानुसार २२ ठिकाणेही निश्‍चित करण्यात आली होती. त्या ठिकाणांमधील हॉटस्पॉटही निश्‍चित करण्यात आले होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी  या बैठकीत  सांगितले. कारण या हॉटस्पॉटमधील नागरिक दुसऱ्या भागात जाऊ शकतील. त्यामुळे इतर भागांतही कोरोनाचे रुग्ण वाढू शकतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे केवळ हॉटस्पॉटच नाही तर संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबरही पालिका आयुक्तांनी बैठक घेतली.  संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय काय बंद राहणार
-  शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून
- प्रत्येक महत्त्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा 
- शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व या कालावधीत बंद राहणार - कोणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.

काय काय सुरू राहणार
- दूध विक्रीची दुकाने, औषध दुकाने आणि डॉक्‍टरांचे दवाखाने सुरू राहणार  - अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या कालावधीत ये-जा करण्याची मुभा - - हायवे (महामार्ग) सुरू राहणार 

याबाबत बोलताना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, "कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हॉटस्पॉट बंद करण्याचा विचार होता; परंतु त्यामुळे पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल, असे नाही. त्यामुळे संपूर्ण शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख