उमेश पाटलांनी आवाहन केले अन्‌ 'नोटा'ने विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले 

त्याच वेळी "नोटा'च आपला उमेदवार असल्याची घोषणा पाटील यांनी केली.
Nota has the highest number of votes in Narkhed Gram Panchayat elections
Nota has the highest number of votes in Narkhed Gram Panchayat elections

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांच्यासाठी त्यांच्या नरखेड (ता. मोहोळ, जि. सोलापूर) गावची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची होती. निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या गटाच्या उमेदवारांचा अर्ज बाद झाला आणि पाटलांनी "नोटा'लाच आपला उमेदवार घोषित केले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी "नोटा'ला भरभरून मते देत विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले. 

"नोटा'च आपला उमेदवार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आणि पाटलांच्या "नोटा' उमेदवाराला भरभरुन मतदान केले. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. 

सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या नरखेड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मधून पाटील गटाकडून वृषाली पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, संगणकीय चुकीमुळे वृषाली पाटील यांचा अर्ज बाद ठरला. त्याच वेळी त्यांनी या प्रभागात नोटा आपला उमेदवार असून मतदारांनी "नोटा'ला मतदान करावे, असे आवाहन केले. या प्रभागातून नोटाला सर्वाधिक 434 मते मिळाली. उमेश पाटील यांच्या विरोधी गटाच्या उमेदवार दीपाली कोल्हाळ यांना 143, तर सविता खंदारे यांना 163 मते मिळाली. 

उमेश पाटील यांच्या पॅनेलने 13 पैकी 12 जागांवर विजय मिळवत नरखेड ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. एका जागेवर "नोटा'ला सर्वाधिक मतदान झाले आहे. 

नोटाला विजयी घोषित करण्याची मागणी 

प्रभाग पाचमधून "नोटा'ला विजयी घोषीत करावे, अशी मागणी मी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसे पत्रही दिले आहे. ता. 6 जानेवारी 2018 रोजी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्वतंत्र आदेश काढून, "नोटा'ला काल्पनिक उमेदवार घोषीत केले आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी "नोटा'ला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्याची तरतूद केली आहे. नगरपालिकांच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणूक काळात हा आदेश काढला आहे. या आदेशात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उल्लेख नाही. या आदेशात तशी दुरुस्ती करावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाला मी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी बोलावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com